संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आली इवलुशी नवी पाहुणी

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अवघ्या काही दिवसांची इवलुशी वाघाटी दाखल झाली आहे

164

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अवघ्या काही दिवसांची इवलुशी वाघाटी दाखल झाली आहे. आईपासून दूरावलेली ही मादी वाघाटी आता उद्यानात नीरा या नावाने ओळखली जाऊ लागली आहे. या मादी वाघाटीच्या आगमनाने उद्यानाने पिंजऱ्यात सांभाळलेल्या वाघाटींची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. उद्यानात आता दोन मादी आणि एक नर वाघाटी आहेत.

( हेही वाचा : सॅटलाईट टॅगिंग केलेल्या कासवाबाबत आली ‘ही’ वाईट बातमी! )

वाघाटीला पशुवैद्यकीय रूग्णालयात आणले

उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक जी मल्लिकार्जून यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा भागातून काही दिवसांच्या वाघाटीला सातारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उद्यानात उपचारांसाठी आणले. ही मादी वाघाटी आपल्या भावासह आईपासून वेगळी झाली होती. सातारा वनविभागाने दोन्ही पिल्लांना आपल्या आईशी भेट घालवून दिली. मात्र आईने तिच्या भावाला नेले. पोटात अन्नपाणी नसल्याने तिची प्रकृती खालावल्याने तातडीने सातारा वनविभागाने वाघाटीला उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले.

मादी वाघाटी नीरा

खंडाळा भागातील उसाच्या शेतात कापणीच्यावेळी वाघाटीची दोन पिल्ले सातारा वनविभागाच्या अधिका-यांना सापडली होती. त्यातील एका पिल्लाला आईने परत नेले नाही. त्यामुळे आईच्या दूधापासून दूर राहिलेल्या मादी वाघाटी पिल्लाची अवस्था फारच केविलवाणी होऊन बसली होती. तिला उद्यानातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले गेले त्यावेळी तिचे वजन ८ ग्रॅम होते. त्यामुळे तिला जीवनदान देण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर होते, अशी माहीती उद्यानाचे व्याघ्र व सिंह सफारीचे वनक्षेत्रपाल विजय बारब्धे यांनी दिली. आता तिचे वजन १४० ग्रॅम झाले आहे. तिच्यासाठी दोन प्राणीरक्षक तसेच इतर काही जणांची खास टीम तयार करुन देखरेख केली जात असल्याचेही बारब्धे यांनी सांगितले. ही मादी वाघाटी नीरा नदीच्या काठावर मिळाल्याने तिचे नाव नीरा ठेवले गेले. उद्यानातील दीपक टोकरे, प्रशांत टोकरे, मयूर जिरवे, संजय बरफ, तुळशीराम शनबार ही टीम इवलुश्या नीराचा सांभाळ करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.