लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री मुंबईतील चर्चगेट आणि चर्नी रोड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडला. या हल्ल्यात प्रवासी तरुणी सुदैवाने बचावली असून, तिच्या गळ्यावर मात्र गंभीर जखम झाली आहे.
रेल्वे कडून महिलांच्या डब्यात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणारे सुरक्षा गार्ड या घटनेच्या वेळी तैनात नसल्याचे जखमी तरुणीने सांगितले आहे. या हल्ल्यानंतर रेल्वेतून रात्रीच्या सुमारास प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
(हेही वाचाः कामाठीपुरातील ‘त्या’ महिलांची अशीही दखल!)
काय घडला प्रकार?
मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी अक्षता नगरे ही तरुणी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास चर्चगेट येथून बोरीवलीकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यातून प्रवास करत होती. या दरम्यान डब्यात सुरक्षा रक्षक अथवा इतर कुठलीही महिला प्रवासी नसल्याचा फायदा घेत, एक तरुण महिलांच्या डब्यात चढला. चर्नी रोड स्थानक येण्यापूर्वी या तरुणाने अक्षताच्या गळ्यातील सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. अक्षताने त्याला विरोध करताच त्याने ब्लेडने अक्षताच्या गळ्यावर वार करून सोनसाखळी खेचण्याचा प्रयत्न केला. अक्षताने आरडाओरडा करताच हा चोरटा चर्नी रोड स्थानक येताच चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेला.
चोरट्याचा शोध सुरू
या चोरट्याने केलेल्या हल्ल्यात अक्षताच्या गळ्यावर गंभीर जखम झाली. तिने चर्नी रोड स्थानकावर उतरून इतर प्रवाशांची मदत घेतली. प्रवाशांनी अक्षताला नजीकच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन चर्चगेट रेल्वे पोलिस ठाण्यात आणले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
(हेही वाचाः बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग लावाल तर खबरदार…)
सुरक्षा रक्षक तैनात करा
माझ्यावर शुक्रवारी रात्री 12च्या दरम्यान मी माझ्या घरी जात होते. रात्री १२:०५ मिनिटांनी माझी लोकल चर्नी रोड रेल्वे स्थानकावर आली. त्यावेळेस डब्यात कोणीही महिला प्रवासी नसल्याचा फायदा घेत एका युवकाने माझ्या गळ्यातील साखळी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यात मी जखमी झाल्यानंतर मी आरडाओरड केली. त्यावेळेस तो युवक लगेच पळून गेला. मोटरमनच्या मदतीने मी कुटुंबीयांना कळवले. या सगळ्या प्रकरणावर मी चर्चगेट लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज माझ्यासोबत ही घटना घडते उद्या ही घटना कुठल्याही महिलेच्या बाबतीत घडू शकते. मुंबईमध्ये अनेक महिला रात्रीचा प्रवास करतात, अशावेळी महिला डब्यात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे, अशी माझी पोलिसांना आणि प्रशासनाला विनंती आहे, असे अक्षताने माध्यमांशी बोलताना सांगितले.
Join Our WhatsApp Community