का झाली फडणवीसांची चौकशी? गृहमंत्र्यांनी दिले उत्तर

फडणवीस यांना आतापर्यंत सहा वेळा नोटीस बजावण्यात आली आहे.

161

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रविवारी सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास चौकशी करण्यात आल्यानंतर फडणवीसांचा जबाब नोंदवण्यात आला. फडणवीसांच्या या चौकशीवरुन भाजप नेते आक्रमक झाले असून हे ठाकरे सरकारचे कटकारस्थान आहे, असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. यावरुन आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांना आतापर्यंत सहा वेळा नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे आरोपी म्हणून पाठवण्यात आली नाही, ही नोटीस म्हणजे समन्स नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः संजय राऊत तुरुंगात जाणार? राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ काय?)

काय म्हणाले गृहमंत्री?

राज्य गुप्तचर विभागाकडे असलेली गोपनीय माहिती बाहेर गेल्याने काही अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्यांचा संबंध आहे त्यांचाय जबाब घेणं गरजेचं आहे. फडणवीस यांनी काही बदल्यांबाबतची माहिती समोर आणली, त्याबाबत माहिती घेण्यासाठी फडणवीसांना सहा वेळा नोटीस पाठवण्यात आली. ही नोटीस म्हणजे समन्स नसून, त्यांच्याकडून फक्त माहिती घेण्यासाठी ती पाठवण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तरे न मिळाल्याने घेतला निर्णय

पोलिस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात येत आहे. याआधी देखील फडणवीसांना या प्रकरणी सायबर पोलिसांकडून पाच ते सहा वेळा नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले नव्हते, तर त्यांच्याकडे प्रश्नावली पाठवण्यात आली होती. पण या प्रश्नावलीला फडणवीस यांनी उत्तरे न दिल्याने रविवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिसांना संपूर्ण सहकार्य देणार असल्याचे सांगितले आहे, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

(हेही वाचाः मंत्र्यांनी गांधींऐवजी दाऊदच्या फोटोपुढे नतमस्तक व्हावं! राणेंचा ठाकरे सरकारवर घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.