हा महाविकास आघाडीचा अहंकार, भाजपाची खरमरीत टीका!

123

महाविकास आघाडीतील पोलिसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांची चौकशी करायला हवी. पण, तस न करता फडणवीस यांनाच ठाकरे सरकारने नोटीस पाठवून दडपशाही सुरू केली आहे. त्यामुळे  ठाकरे सरकारच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्यावतीने शहरातील १० ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले. ठाकरे सरकारला `विनाशकाले विपरीत बुद्धी” सुचली असून, महाविकास आघाडीतील अहंकार दिसत आहे, अशी टीका करण्यात आली. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोर्ट नाका येथे मुख्य आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

भाजपाचे माजी नगरसेवक अर्चना मणेरा, मुकेश मोकाशी, मंडल अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कासारवडवली, वागळे इस्टेट, पोखरण रोड नं. २, कळवा, मुंब्रा, दिवा आदींसह १० ठिकाणी आंदोलन करून नोटिशींची होळी करण्यात आली. कासारवडवली येथील आंदोलनानंतर माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

( हेही वाचा: तर योग्य तो धडा शिकवला जाईल, हे याद राखा! )

लढाई आणखी तीव्र करणार

महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीसांसह भाजपा कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. ठाकरे सरकारला ”विनाशकाले विपरीत बुद्धी” सुचली असून, अहंकार दिसून येत आहे. या प्रकाराबद्दल जनतेच्या भावना तीव्र असून, महाविकास आघाडी सरकारविरोधात जनमत तयार होत आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे उद्योग झाकण्याचा प्रयत्न केला जात असतानाच, विरोधकांवर दडपशाही केली जात आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. ठाकरे सरकारने कितीही दडपशाही केली, तरी भाजपा कार्यकर्त्यांचा आवाज दाबता येणार नाही. फडणवीस यांच्या पाठीशी भाजपाचे कार्यकर्ते असून, भ्रष्टाचाराविरोधातील लढाई आणखी तीव्र केली जाईल, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.