‘घोटाळे कराल तर…’ केजरीवालांचा मंत्री-आमदारांना धमकीवजा इशारा

काही लोक पंजाबला लुटत होते, आता ही लूट थांबेल. आता सरकारचा प्रत्येक पैसा गरिबांवर खर्च केला जाईल.

103

नुकत्याच हाती आलेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये आम आदमी पार्टीने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. पंजाबात दिग्गजांना हरवत आम आदमी पक्षाने आपली ताकद दाखवून दिली आहे. तब्बल 92 जागा जिंकत आपने पंजाबमधून सर्वच बड्या राजकीय पक्षांना झाडून काढले. पक्षाला मिळालेल्या या यशामुळे आम आदमी पक्षाने रविवारी अमृतसर येथे रोड शो केला. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील जनतेचे आभार मानत, पंजाबमधील सर्व आमदारांना इशाराही दिला आहे.

सत्तेवर आल्यानंतर कुठल्याही आमदाराने घोटाळा केला तर त्याला थेट तुरुंगवास भोगावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी पंजाबमधील मंत्री व आमदारांना थेट इशारा दिला आहे.

(हेही वाचाः राऊतांमध्ये हिंमत आहे का? फडणवीसांचे राऊतांना आव्हान)

काय म्हणाले केजरीवाल?

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांचे अरविंद केजरीवाल यांनी अभिनंदन करत कौतुक केले आहे. माझा धाकटा भाऊ भगवंत मान हा अतिशय प्रामाणिक माणूस आहे. त्याच्या रुपाने पंजाबला आजवरचा सर्वात प्रामाणिक मुख्यमंत्री मिळणार आहे. पंजाबात प्रामाणिक सरकार स्थापन करणे हे आमचे कर्तव्य आहे. पंजाबच्या सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने किंवा राज्यातील कुठल्याही आमदाराने घोटाळा केला, तर त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, असा धमकीवजा इशारा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील सर्व आमदारांना दिला आहे. काही लोक पंजाबला लुटत होते, आता ही लूट थांबेल. आता सरकारचा प्रत्येक पैसा गरिबांवर खर्च केला जाईल, पंजाबवर खर्च केला जाईल, असा विश्वास केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेला दिला आहे.

(हेही वाचाः ‘कितीही प्रयत्न केला तरी मला गोवू शकत नाही!’ फडणवीसांचा सरकारला इशारा)

आश्वासने पूर्ण करणार

आपने पंजाबच्या जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. काही आश्वासने लगेच पूर्ण होतील तर काहींना अवधी लागेल, पण प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू, असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.

पंजाबचा प्रत्येक मुलगा मुख्यमंत्री होईल

16 मार्चला भगवंत मान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, पण त्या दिवशी फक्त भगवंत मान मुख्यमंत्री होणार नाहीत, तर पंजाबचा प्रत्येक मुलगा मुख्यमंत्री होईल, असे सांगत केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला आमंत्रित केले आहे.

(हेही वाचाः हा महाविकास आघाडीचा अहंकार, भाजपाची खरमरीत टीका!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.