मुंबईत ‘या’ चार ठिकाणी तापमानाने गाठली चाळीशी

मार्च महिन्यातील सरासरी तापमान पाहता सध्याचे तापमान ६ ते ८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले जात आहे.

117

कडाक्याच्या उन्हात वीकेण्ड नकोसा झालेला असताना, रविवारी मुंबईतील चार ठिकाणी कमाल तापमान चाळीस अंशांच्याही पुढे गेले आहे. चेंबूरमध्ये संपूर्ण मुंबई परिसरापेक्षाही जास्त कमाल तापमान नोंदवले गेले. चेंबूरमध्ये कमाल तापमानाची नोंद ४०.७ अंश सेल्सिअसवर पोहोचली. २०२१ नंतर दुस-यांदा मार्च महिन्यातील मुंबईतील कमाल तापमानात दुस-यांदा वाढ दिसून आली. पुढील दोन दिवस उत्तर कोकण परिसरात उष्णतेच्या लाटांची परिस्थिती असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात २८ मार्च रोजी कमाल तापमान ४०.९ अंशावर नोंदवले गेले होते. त्यानंतर रविवार १३ मार्च २०२२ रोजी चेंबूरमध्ये कमाल तापमानाची झालेली नोंद दुस-या स्थानावर पोहोचली. तर घाटकोपर, पवईमध्ये कमाल तापमान ४०.३ तर राम मंदिर आणि मुलुंडमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले.

(हेही वाचाः ‘या’ देशाने एकाच दिवशी दिली 81 जणांना फाशी! काय आहे कारण?)

तापमानाचा पारा वाढतोय

मार्च महिन्याच्या दुस-या आठवड्यात आता थंडीचा लवलेशही नसताना गेल्या आठवड्यापासून दुपारच्या उन्हात सातत्याने वाढ होत आहे. गेला आठवडा मुंबई व नजीकच्या परिसरांत ३७ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान नोंदवले जात होते. परंतु आता मुंबई व नजीकच्या परिसरांमध्ये कमाल तापमान ३८ ते ४० अंशापर्यंत नोंदवले जात आहे. मार्च महिन्यातील सरासरी तापमान पाहता सध्याचे तापमान ६ ते ८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले जात आहे.

मुंबई नजीकच्या भागांतील कमाल तापमानाची नोंद

  • डहाणू – ३८ अंश सेल्सिअस
  • छत्रपती शिवाजी महाराज स्थानक आणि माटुंगा – ३८.३ अंश सेल्सिअस
  • वाशी आणि नवी मुंबई – ३८.४ अंश सेल्सिअस
  • सांताक्रुझ – ३८.६ अंश सेल्सिअस
  • पालघर आणि विरार – ३९.५ अंश सेल्सिअस
  • उल्हासनगर आणि पनवेल – ३९.३ अंश सेल्सिअस
  • कोपरखैरणे आणि नवी मुंबई महानगरपालिका – ३९.४ अंश सेल्सिअस
  • बदलापूर – ३९.५ अंश सेल्सिअस
  • भिवंडी – ३९.६ अंश सेल्सिअस
  • ठाणे – ३९.७ अंश सेल्सिअस
  • कल्याण, डोंबिवली – ३९.७ अंश सेल्सिअस
  • तळोजा – ३९.७ अंश सेल्सिअस
  • दक्षिण कोकणातही रत्नागिरी येथे कमाल तापमानाची नोंद ३९.३ अंश सेल्सिअसवर पोहोचली.

(हेही वाचाः रशिया-युक्रेन युद्धावर बोलणारे काश्मिरी हिंदुंवरील अत्याचारांबाबत गप्प का?)

आरोग्याची काळजी घ्या

तापमानात अचानक चार अंशापेक्षा जास्त वाढ झाली की मानवी शरीराला अचानक तापमान वाढ सहन होत नाही. त्यामुळे दुपारच्या उन्हातही बाहेर जाणे टाळा, सतत पाणी पीत रहा. प्रवासातही पाण्याची बाटली सोबत ठेवा. काही तासांनी लिंबू किंवा कोकम सरबत घ्या. डोक्यावर टोपी किंवा शाल ठेवा, डोळ्यांवरही चष्मा लावा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.