महाराष्ट्र अशांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चौकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी. देवेंद्र फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा दावा भाजपा प्रदेशचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
फडणवीसांना पाठवलेल्या नोटीसची होळी
पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली. त्याच नोटीसचा निषेध करण्यासाठी रविवारी नागपुरातील हजारो भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी नोटीसची होळी करण्यात आली.
राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करू
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलेल्या पोलीस बदल्यांच्या घोटाळ्याचा राज्य सरकारने तपास करावा. माहितीचा स्रोत विचारण्यापेक्षा ती खरी की खोटी याची चौकशी करावी आणि दोषी मंत्र्यांवर कारवाई करावी. नोटीस पाठवून फडणवीस यांच्यावर राज्य सरकारने दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. हे चुकीचे आहे. अशा दबाव तंत्राने भाजपाचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत. आम्ही महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेपर्यंत पोहोचून राज्य सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करू.
(हेही वाचा – सोनिया गांधी म्हणाल्या, …तर मी, राहुल आणि प्रियांकाही राजीनामा देऊ!)
विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस यांना सरकारमधील भ्रष्टाचार आणि नियमबाह्य गोष्टी बाहेर आणण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्याच अधिकारान्वये फडणवीस माहिती विधिमंडळात आणि जनतेसमोर मांडत असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. या आंदोलनाला प्रामुख्याने पद्मश्री विकास महात्मे, माजी मंत्री अनिल बोंडे, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार गिरीश व्यास उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community