मनसेचा निर्धार! शिवसेनेची गाडी पुन्हा पलटी करणार

130

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून त्यांनी जोरदार कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर आपलीच पालिकेवर सत्ता यावी, यासाठी राजकीय पक्ष जनतेला आवाहन करत आहे. याकरता एकमेकांवर कुरघोडी करणं, राजकीय टीका करणं, आरोप-प्रत्यारोप आणि जुन्या आठवणींना उजाळा देत शक्ती प्रदर्शन करण्याचं काम चालू आहे. नुकताच मनसेचा पुण्यात वर्धापन सोहळा झाला. या पार्श्वभूमीवर मनसेने पुण्यातही मोठं शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले. तर मनसेनेही यंदाच्या निवडणुकीमध्ये आता दंड थोपटला असून शिवसेनेला डिवचण्याचे काम सुरु केल्याचे दिसतेय. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आता एक ट्विट करत शिवसेनेला जुनी आठवण करुन देत जणू आव्हानच दिले आहे.

जुनी आठवण करुन मनसेनं काढली खपली!

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जुन्या गोष्टीची आठवण करुन दिली आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज समर्थकांकडून आणि मनसैनिकांकडून संजय राऊत यांची गाडी फोडण्यात आली होती. त्यावेळी घडलेल्या घटनेचा जुना फोटो ट्विट करत संदीप देशपांडे यांनी राऊतावर टीका केली आहे.

(हेही वाचा – फडणवीसांनी आता एकच बॉम्ब फोडला पण…! बावनकुळेंचा इशारा )

काय आहे देशपांडेंचे ट्वीट

या ट्विटमध्ये संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची गाडी पलटी केली होती, या निवडणुकीतही आम्हीच तुमची गाडी पलटी करणार, असे ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे.

संदीप देशपांडे आणखी एक सूचक ट्वीट

मनसेच्या वर्धापन दिनी पुणे येथे झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल केली. त्यावर आमचे राज्य हे मिमिक्रीवर चालत नाही, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला. राऊतांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्वीटवरुन सुद्धा चर्चा रंगली आहे.

जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरचं जेवण मागतात, काहींना पुस्तकं लागतात, काहींना औषध लागतात, यापुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असे सूचक ट्वीट संदीप देशपांडे यांनी केले आहे. यामुळे आता या सगळ्याचा नेमका अर्थ शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.