केमिस्ट्री विषयाचा १२ वी परीक्षेचा पेपर शनिवारी फुटल्याचे विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी सभागृहात सांगितले. विलेपार्ले येथे ही पेपर फुटल्याची घटना घडली असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटला नसल्याचे सभागृहात स्पष्टीकरण दिले. या प्रश्नपत्रिकेचे वाटप केल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
विधानपरिषदेत वर्षा गायकवाड यांचं निवेदन
१२ वी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या विषयावर वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाबाबत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, नियमानुसार सकाळी १०.२० वाजता प्रश्नपत्रिकेचे वाटप झाले होते. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
(हेही वाचा -फडणवीस गोव्याच्या विजयाचे शिल्पकार म्हणून त्यांचं मोठं स्वागत पण…, राऊतांचं टीकास्त्र)
शनिवार, दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इ. बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. त्यात तथ्य नाहीं. या प्रकरणी आज विधानपरिषदेत मी केलेलं निवेदन. pic.twitter.com/5TnlPxChek
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 14, 2022
खासगी शिकवणीचा मालक पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले परीक्षा केंद्र क्रमांक ३६०१ याठिकाणी पेपर मोबाईलमध्ये आढळून आला होता. एक विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर उशिरा आलेला असताना तिचा मोबाईल केंद्रावर तपासण्यात आला. त्या विद्यार्थीनीच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्री विषयाच्या पेपरचा काही भाग आढळून आला. नेहमीच्या वेळेपेक्षा ही विद्यार्थिनी उशिरा केंद्रावर हजर झाली होती. विद्यार्थीनीच्या मोबाईलवर पेपर आढळून आला म्हणून विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच विलेपार्ले पोलिसांनी मालाडच्या एका खासगी शिकवणीच्या मालकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे. या खाजगी शिकवणीच्या मालकाचे नाव मुकेश धनसिंग यादव आहे आणि यालाच पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थिनींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून चौकशीनंतर त्या मुलींना सोडून देण्यात आल्याचे कळते. विद्यार्थिनीचा मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस सध्या पुढील चाैकशी करत आहेत