चीनमधून मोठ्या प्रमाणात आलेले बाराशे चायनीज ड्रोन न्हावा शेवा येथे जप्त करण्यात सीमा शुल्क अधिकाऱ्यांना यश आले आहे. चायनीज ड्रोनवर भारतात बंदी घातल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. सीमा शुल्क विभागाकडून चायनीज ड्रोनसह चीन येथून आयात करण्यात आलेल्या खेळणी आणि इंधन पंप जप्त करण्यात आले आहे.
परदेशी ड्रोन आयातीवर बंदी असतानाही पहिली कारवाई
सीमा शुक्ल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेने माहितीच्या आधारे न्हावा शेवा बंदरात शनिवारी चीन येथून आलेला कंटेनर ताब्यात घेतला आहे. या कंटेनरची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात चायनीज खेळणी, इंधन पंपासह बाराशे चिनी बनावटीचे ड्रोन जप्त करण्यात आले आहे. भारतात परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घातल्यानंतरची ही पहिली सर्वात मोठी कारवाई आहे. तर चीन येथून आयात करण्यात आलेल्या वस्तूच्या यादीत ड्रोनचा उल्लेख करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले.
(हेही वाचा – बारावीचा पेपर फुटलाच नाही तर….; शिक्षणमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन)
१४.११ लाख किमतीचे ३६ ड्रोन जप्त
भारत सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून काही अपवादांसह परदेशी ड्रोनच्या आयातीवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. देशात ड्रोनच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत, डायरेक्ट टॉरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (डीजीएफटी) ने गेल्या महिन्यात एक अधिसूचना जारी केली होती, या अधिसूचनेत परदेशी ड्रोनच्या आयात बंदरावर बंदी घालण्यात आलेली असल्याची माहिती सीमा शुल्क अधिकारी यांनी सांगितले आहे. जून २०१८ मध्ये, डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (डीआयआर) अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा येथे १४.११ लाख रुपये किमतीचे ३६ ड्रोन जप्त केले होते.
Join Our WhatsApp Community