एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवासी वाहतूक सेवा गेले चार महिने कोलमडली आहे. त्यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाने आता कंत्राटी चालक भरती सुरु केली आहे. खासगी एजन्सीच्या माध्यमातून ही भरती सुरु असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात २५ जणांची भरती करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी बेरोजगार उमेदवारांकडून फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची चाचणी घेऊन मग त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जात आहे.
कर्मचाऱ्यांचा संपामुळे प्रवाशांची गैरसोय
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आता चार महिने होत आले आहेत. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी हा संप सुरु आहे. संपला आता चार महिने होत आले तरी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. पण एसटीची सेवा बंद झाल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी शाळेत, महाविद्यलयात जाऊ शकत नाहीत. शहरी तसेच ग्रामीण या दोन्ही भागात हा त्रास होत आहे.
(हेही वाचा – बारावीचा पेपर फुटलाच नाही तर….; शिक्षणमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन)
…तरीही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम
दरम्यान एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन, नोटीस, निलंबन असे सारे मार्ग अवलंबून पाहिले पण कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे महामंडळाने नव्याने चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महामंडळाकडून राज्यस्तरावर खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून हि प्रक्रिया राबविली जात आहे.
सिंधुदुर्गात एसटी महामंडळाकडून चालक भरती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात चालकांची २५ पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी जाहिरात देण्यात आली होती. त्यांनतर चालक पदासाठी अनेक उमेदवारांनी गर्दी केली होती. यामध्ये बेरोजगार उमेदवारांसह खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची संख्या अधिक होती. कंत्राटी पद्धतीने करार करत हे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत. या उमेदवारांची चाचणी रविवारी कणकवलीच्या मुडेश्वर मैदानावर घेण्यात आली. चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांना १५ दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांनतर त्यांची प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरु होणार आहे. चालक भरतीत शिक्षण आणि वयाची अट मात्र शिथिल करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community