‘होळी’साठी झाडे कापणार असाल, तर हे वाचाच…

112

येत्या १७ मार्च २०२२ रोजी असणाऱ्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही प्रकाराची वृक्षतोड करु नये. कोणत्याही प्रकारची अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळून आल्यास याबाबत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘होळी’च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका अधिका-यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास त्वरित कळवावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीच्या वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे

( हेही वाचा : प्रवास होणार सुखकर! ‘या’ चार नवीन ‘बस’ मार्गांचे उद्घाटन )

झाड कापणे हा अपराध

पर्यावरण जपणे व जोपासणे हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. या अनुसार आपणा सर्वांना प्राणवायू देणा-या झाडांचे, वृक्षांचे संरक्षण करणे देखील आपणा सर्वांना आवश्यक आहे. याच अनुषंगाने ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत करण्यात आलेल्या विविध तरतुदींमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडण्यास / कापण्यास कारणीभूत होणे, हा कलम २१ अन्वये अपराध आहे. यानुसार अनधिकृत वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तिला कमीत कमी रुपये १,०००/- पासून रुपये ५,०००/- पर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच यासाठी एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

स्थानिक पोलील ठाण्यास त्वरित कळवावे

‘होळी’ च्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास, सतर्क नागरिकांनी महानगरपालिका अधिका-यांना व स्थानिक पोलीस ठाण्यास त्वरित कळवावे. जेणेकरुन, सदर बाबत तात्काळ कारवाई करणे शक्य होईल, असेही आवाहन परदेशी यांनी यानिमित्ताने केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.