पवई, मुलुंडने तोडला ४ वर्षांचा उष्णतेचा रेकॉर्ड!

244

गेल्या चार दिवसांपासून मुंबई व महानगरप्रदेशात सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेचा सोमवारी चांगलाच भडका उडाला. रात्रंदिवस घामटलेल्या वातावरणात दिवसाचा रहाटगाडा सुरु असतानाच मुंबई व नजीकच्या बहुतांश भागांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. संपूर्ण मुंबई व महानगर परिसराच्या तुलनेत मुलुंड आणि पवईत कमाल तापमान ४१.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. हा रेकॉर्ड गेल्या ४ वर्षांतील मुंबईतील मार्च महिन्यातील कमाल तापमानातील सर्वात जास्त नोंद ठरली. याआधी २६ मार्च रोजी २०१८ रोजी ४१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले होते.

( हेही वाचा : मुंबईत ‘या’ चार ठिकाणी तापमानाने गाठली चाळीशी )

उद्याही मुख्यत्वे उत्तर कोकणात सूर्य आगच ओकणार असल्याचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीमुळे ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पुढील ३ तीन दिवस मुंबईत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील, असेही मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

वीकेण्ड उकडलेला असतानाच सोमवारचा दिवसही मुंबईसाठी चांगलाच उकाड्याचा ठरला. मुंबईतील बोरिवली, चेंबूरमध्ये कमाल तापमान ४०.९ अंश सेल्सिअस. घाटकोपरमध्ये ४०.६ अंश सेल्सिअस, पालघर आणि विरारमध्ये ४०.४ अंश सेल्सिअस, सायनमध्ये ४० अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान पोहोचले. उर्वरित भागात माटुंग्यात ३९.८ अंश सेल्सिअस, सांताक्रूझमध्ये ३९.६ अंश सेल्सिअस, कुलाबा ३९.४ अंश सेल्सिअस, छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये ३९.१ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाची नोंद झाली. एकट्या मुंबईत सध्याच्या दिवसांत सरासरीपेक्षाही सहा ते आठ अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त तापमान नोंदवले जात आहे.

मुंबईनजीकच्या भागांतील कमाल तापमानाची नोंद

  • उल्हासनगर, मुंब्रा – ४०.२ अंश सेल्सिअस
  • पनवेल, तळोजा – ४०.३ अंश सेल्सिअस
  • ठाणे – ४०.४ अंश सेल्सिअस
  • बदलापूतहर , कल्याण, डोंबिवली – ४०.४ अंश सेल्सिअस
  • कोपरखैराणे ४०.६- अंश सेल्सिअस
  • कर्जत – ४१.३ अंश सेल्सिअस
  • मीरारोड – ४०.८ अंश सेल्सिअस

का आली आहे उष्णतेची लाट

राज्यात सध्या देशाच्या ईशान्य भागातून शुष्क वारे वाहत आहे. शिवाय किनारपट्टीचे तापमान नियंत्रण राखणारे खारे वारे हे सामान्यतः दुपारी बारा वाजता किनारपट्टीत ठरलेल्या वेळेत येत नाही आहेत. खारे वारे किनारपट्टी भागांत दुपारी दोन वाजता येत आहेत. परिणामी, कमाल तापमानात प्रचंड वाढ होत आहे.

काय काळजी घ्याल –

  1. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.
  2. दीर्घ काळ आजारी व्यक्ती, तसेच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेली व्यक्ती, लहान बालके किंवा ज्येष्ठ व्यक्तींनी शक्यतो दिवसा घराबाहेर जाणे टाळावे. या वयोगटाला उष्णतेशी संबंधित आजार बळकावण्याची भीती असते.
  3. कॉटनचे तसेच फिक्या रंगाचे कपडे परिधान करा. अवजड कपडे घालू नका.
  4. भरपूर पाणी प्या. घराबाहेर जात असाल तरीही पाण्याची बाटली आवर्जून बाळगा.
  5. लिंबू सरबत, लस्सी, ताक आदी द्रवपदार्थांचे सेवन करा
  6. चहा, कॉफी, दारूचे सेवन टाळा
  7. डोक्यावर टोपी किंवा सुती कपडा बांधा.
  8. या काळात सतत घराबाहेर असणा-या व्यक्तीला चक्कर येण्याची शक्यता असते. या लोकांनी सतत शरीराव पाण्याचा थोड्या वेळाने मारा करावा. शरीर थंड राहण्यासाठी या माणसांचा पाण्याशी संपर्क येणे गरजेचे आहे. जास्त त्रास उद्भवल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.