जे रोहितने करुन दाखवलं ते कोणत्याही भारतीय कर्णधाराला जमलं नाही

या मालिकेत पहिल्यांदाच कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळणा-या रोहित शर्माने नवा विक्रम रचला आहे.

166

भारत विरुद्ध श्रीलंकेतील नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला आहे. दुस-या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर तब्बल 238 धावांनी विजय मिळवत भारताने ही कसोटी मालिका खिशात घातली. या मालिकेत पहिल्यांदाच कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळणा-या रोहित शर्माने नवा विक्रम रचला आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश दिला आहे. कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणातच ही किमया साधणारा रोहित हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

(हेही वाचाः ‘भगवंता’ काय केलंस? शपथविधीसाठी ‘आम आदमीचं’च शेत तुडवलंस?)

रोहितची खरी ‘कसोटी’

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वनडे आणि टी-20 नंतर अचानक आपल्या कसोटी कर्णधार पदाचा देखील राजीनामा दिला. त्यामुळे कसोटी कर्णधारपदाची माळ रोहित शर्माच्या गळ्यात पडली. कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नसणा-या रोहितसाठी हे कर्णधारपद म्हणजे एक कसोटीच होती.

रचला नवा विक्रम

पण रोहित या कसोटीला खरा उतरला. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या मोहाली कसोटी सामन्यात रोहितच्या संघाने भारताला डावाने विजय मिळवून दिला. तर बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडिअम वरील दुस-या कसोटीत 238 धावांचा मोठा विजय भारताला मिळाला. कसोटी कर्णधार म्हणून पदार्पणातच प्रतिस्पर्धी संघाला व्हाईट वॉश देण्याची कामगिरी करणारा रोहित हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

(हेही वाचाः ऑफिस टायमिंग नंतर बॉसच्या कटकटीपासून होणार सुटका? सुप्रिया सुळेंनी मांडले अनोखे ‘विधेयक’)

पूर्णवेळ कर्णधार म्हणूनही अनोखी कामगिरी

रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत एकाही पराभवाचा सामना केला नाही. न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 3-0 ने मालिका जिंकली, तसेच वेस्ट इंडिजला देखील वनडे आणि टी-20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. तर भारत आणि श्रीलंकेदरम्यान कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने श्रीलंकेला टी-20 मालिकेत 3-0 ने पराभूत केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.