‘एअर इंडिया’च्या अध्यक्षपदी ‘टाटा सन्स’च्या अध्यक्षाची नियुक्ती

152

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना एअर इंडियाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. यापूर्वी तुर्कीच्या इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून घोषणा करण्यात आली होती. परंतु, भारतातील विरोधानंतर इल्कर आयसी यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर एन. चंद्रशेखर यांच्याकडे एअर इंडियाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.

69 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाची

एअर इंडिय़ा ही टाटाचीच मूळ कंपनी होती. परंतु, स्वातंत्र्योत्तर काळात तिचे सरकारीकरण करण्यात आले होते. मागच्या वर्षी टाटा ग्रुपने 18 हजार कोटी रूपयांना एअर इंडिया कंपनी विकत घेतली. सुमारे 69 वर्षांनंतर जानेवारी 2022 मध्ये एअर इंडिया ही कंपनी पुन्हा टाटा समूहाचा भाग बनली आहे.

(हेही वाचा – नगरसेवक ‘माजी’ व्हायला नाही ‘राजी’ )

जाणून घ्या एन. चंद्रशेखरनबद्दल

  • एन. चंद्रशेखरन ऑक्टोबर 2016 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळात सहभागी झाले होते. जानेवारी 2017 मध्ये त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन चंद्रशेखरन यांची 5 वर्षांसाठी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती केली.
  • संचालक मंडळाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदी आणखी पाच वर्षे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांच्याकडे एअर इंडियाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.
  • एन. चंद्रशेखरन यांचा जन्म 1963 मध्ये तामिळनाडू मधील मोहनूर येथे झाला. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमसीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.
  • चंद्रशेखरन 1987 मध्ये टाटा समूहात सामील झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली टीसीएस ही टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी बनली. शिवाय ही कंपनी नफ्याच्या बाबतीत सर्वात यशस्वी ठरली.
  • चंद्रशेखरन हे टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस सारख्या कंपन्यांच्या बोर्डाचे अध्यक्ष आहेत. सायरस मिस्त्री यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर एन. चंद्रशेखरन यांना ‘टाटा’च्या संचालक मंडळात घेण्यात आले होते.
  • टीसीएसमध्ये 2009 सालापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.