‘या’ स्पर्धेतील विश्वविजेत्यांचा सरकार करणार विशेष सन्मान !

107

मल्लखांब खेळामध्ये विश्वविजेत्या ठरलेल्या दिपक शिंदे व हिमानी परब यांचा राज्य शासनाकडून विशेष सन्मान करुन त्यांचा सत्कार करण्यात येईल, असे क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत सांगितले. याबाबत लक्षवेधी सूचना विधानपरिषद सदस्य विजय ऊर्फ भाई गिरकर यांनी मांडली होती.

या यादीत मल्लखांबचा समावेश

राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनसेवेत थेट नियुक्ती करण्याच्या खेळाच्या यादीमध्ये मल्लखांब खेळाचा समावेश करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. केंद्र शासनाने विविध विभागातील गट क मधील पदांवर खेळाडूंच्या नियुक्ती संदर्भात एकत्रित सूचना दिल्या आहे. यामध्ये 43 खेळप्रकार निश्चित केले आहेत. त्यानंतर केंद्र शासनाने खेळाडूंच्या नियुक्तीसाठी 43 ऐवजी 63 खेळ प्रकार निश्चित केले आहेत. या खेळ प्रकारांच्या यादीमध्ये ‘मल्लखांब’ या देशी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे.

( हेही वाचा: सर्वोत्तम कामगिरी करत, श्रेयस अय्यरने पटकावला ‘हा’ पुरस्कार )

तर नवीन खेळाडू तयार होतील

मल्लखांब या देशी खेळ प्रकारातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, याकरता ‘मल्लखांब’ या खेळास 5 टक्के खेळाडू आरक्षणाचे लाभ देण्यात येत आहे. थेट नियक्तीमध्येसुद्धा या खेळाचा समावेश करण्यात येईल आणि अशा खेळाडूंना क्रीडा विभागामध्ये नियुक्ती करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन आणि नवीन खेळाडू तयार होण्यास मदत होईल, असेही राज्यमंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.  या लक्षवेधीमध्ये विधानपरिषद सदस्य कपिल पाटील, अनिकेत तटकरे, सतिष चव्हाण, संजय दौंड, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.