बेशिस्त वागणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तांनी शिस्तीचे धडे देत शिस्त न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी तंबी देखील दिली आहे. त्याबरोबर रिक्षा टॅक्सी चालक मालक आणि त्यांच्या संघटना यांच्या वाहतूक संबंधित काही समस्या असतील तर त्या स्थानिक पोलीस ठाणे अथवा वाहतूक विभागाकडे लेखी स्वरूपात देण्यात याव्यात असे देखील आयुक्तांनी म्हटले आहे.
( हेही वाचा : राज्यातील कुपोषणाचे ‘हे’ आहे मुख्य कारण- उच्च न्यायालय! )
बेशिस्त चालकांना शिस्तीचे धडे
मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांची मनमानी तसेच बेशिस्तपणाच्या अनेक तक्रारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तसेच बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांना शिस्तीचे धडे देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोमवारी दुपारी रिक्षा चालक मालक तसेच ओला, उबेर संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक, सह पोलीस आयुक्तांनी (वाहतूक) आयोजित केली होती.
या बैठकीला विविध संघटनांचे २४ प्रतिनिधी आणि पदाधिकारी हजर होते. यावेळी संघटनांच्या प्रतिनिधींना पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्याकडे ओला, उबेर व इतर टॅक्सीचे चालकांच्या विरुद्ध नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंघाने १४ मार्च सोमवारी दुपारी १२.३० वाजता मुंबईतील ओला, उबेर व इतर टॅक्सी युनियनचे प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीमध्ये पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, पोलीस सह आयुक्त, वाहतुक, मुंबई, मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य तसेच मुंबई टॅक्सीमेन असोसिएशन, मुंबई रिक्षा टॅक्सी ओनर्स असोसिएशन, स्वाभिमानी टॅक्सी युनियन, मुंबई ऑटो/टॅक्सी युनियन, मुंबई रिक्षा मेन्स युनियन, एम एन एस वाहतुक सेना, टॅक्सी आणि रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी त्याचप्रमाणे ओला आणि उबेर यांचे प्रतिनिधी असे एकूण २४ प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईमध्ये सध्या वाहतूक समस्येबाबत तसेच टॅक्सी- रिक्षा चालक यांची भूमिका आणि कर्तव्ये याबाबतची माहिती बैठकीत दिली.
पोलीस सह आयुक्तांनी सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे सूचना दिल्या…
- मुंबई शहरामध्ये दररोज टॅक्सी रिक्षा वाहनांची संख्या वाढत असते परंतु वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यांची संख्या वाढत नाही. त्यामुळे टॅक्सी रिक्षा चालकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालक करावे.
- टॅक्सी-रिक्षा यांचे चालक हे त्यांची वाहने रेल्वे स्थानकासमोर चुकीच्या पद्धतीने उभी करतात त्यामुळे त्याचा त्रास सर्व सामान्य जनतेला होतो त्यामुळे त्यांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे अन्यथा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व टॅक्सी रिक्षा चालक यांचेवर वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- ज्या ठिकाणी टॅक्सी रिक्षा यांचे वाहन थांबे काढून टाकले असतील त्याची यादी संबधित पोलीस ठाण्यात आणि वाहतूक पोलीसांना द्यावी. त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- मुंबईमध्ये टॅक्सी रिक्षा यांचे पुरेसे स्टॅण्ड नाहीत याची कल्पना असून पुरेसे स्टॅण्ड निर्माण करण्याकरीता संभाव्य स्टॅण्डची वार्ड निहाय यादी वाहतूक पोलिसांना सादर करावी.
- टॅक्सी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व चालक मालक यांनी सर्व वाहतूक नियमांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे आणि मुंबई शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यामध्ये हातभार लावावा अशा सूचना देत पुढील महिन्यात या सर्व सूचनांचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक बोलावली जाईल असे सांगण्यात आले.