सिंहगडावर ई-बसेस सुरू करणे मागील काही महिन्यांपासून प्रस्तावित आहे. ट्रायल रन आणि बैठकांनंतर अजूनही ई-बसेससाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
( हेही वाचा : राज्यात उन्हाचे चटके! ‘या’ जिल्यांसाठी यलो अलर्ट )
सिंहगडावर ऑक्टोबर महिन्यापासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून गडावर खासगी वाहनांना बंदी करत, पायथ्यापासून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही ई-बस सेवा उपलब्ध करणे नियोजित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांसह पीएमपी, वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ई-बसने सिंहगडाचा दौरा केला होता. मात्र, त्यानंतर ही सेवा मात्र चर्चेमध्येच अडकल्याचे चित्र आहे. यासंदर्भात नवीन वर्षात ही सेवा सुरू होण्याचे संकेत देखील पीएमपीने दिले होते. परंतु, हा मुहूर्त देखील हुकला आहे.
ई-बसेसचे नियोजन
गोळेवाडी ते सिंहगड किल्ला या मार्गावर सेवा देण्यात येणार आहे. यासाठी ई-बसेस सोडण्याचे नियोजन आहे. तर गडाच्या पायथ्याला पार्किंग जागा आणि चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. तर या बसेसच्या संचलनातून येणारे उत्पन्न देखील वनविभागाला देण्यात येणार आहे. या बससेवेमुळे गडावर जाण्यासाठी सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मात्र सेवा नेमकी केव्हा सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
Join Our WhatsApp Community