५.१ टक्के शाळकरी मुलांना तंबाखूचे व्यसन! विधानसभेत मांडली आकडेवारी  

113

इंडियन इन्सिस्ट्यूट ऑफ पॉप्युलेशन सायन्स यांनी केलेल्या जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण २०१९ च्या चौथ्या फेरीत देशात १३ ते १५ वयोगटांतील बालकांचे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याचे प्रमाण ५.१ टक्के असल्याचे आढळून आले आहे, तर गेल्या १० वर्षांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ४२ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि योगेश सागर यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.

२५ कोटी रुपयांचा दंड जमा

राज्यात १८ वर्षांखालील मुले आणि १८ वर्षांवरील व्यक्तींना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागू नये, यासाठी केंद्रशासनाच्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर कार्यवाही करण्यात येत आहे. कोटपा कायदा २००३’ अंतर्गतच्या विविध कलमांतर्गत मुंबईत या वर्षी ५ कोटी रुपयांच्या आसपास, तर महाराष्ट्रात अंदाजित २५ कोटी रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे, असेही राज्यमंत्री कदम म्हणाले.

(हेही वाचा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडली! कारण…)

शाळांवर कारवाई करण्यात येईल

केंद्रशासनाच्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा) २००३ ची राज्यभर कार्यवाही करण्यात येत असून या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डच्या परिसरात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण आणि साठवण करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यासाठी केंद्रशासनाच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरणांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात ‘पिवळी रेषा रेखांकित’ केली जात आहे. ज्या शाळा या पिवळी रेषा रेखांकित नियमांचे पालन करणार नाहीत, अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री डॉ. कदम यांनी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.