वाढत्या कडाक्यात आता थेट सूर्याच्या संपर्कात येणा-या मुंबईकरांना आता डोकेदुखीचा आणि चक्कर येण्याचा त्रास उद्भवू लागला आहे. या दिवसांत शक्यतो दुपारच्या कडक उन्हात प्रवास टाळणे हाच खात्रीलायक उपाय असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
या काळात गर्भवती महिलांनाही उन्हाच्या संपर्कात आल्यास चक्कर येत असल्याचे दिसत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. उन्हाच्या संपर्कात आल्यास चक्कर येणे किंवा डोकेदुखीवर काही खास औषधांची गरज नसून केवळ उन्हाशी थेट संपर्क टाळणे आवश्यक असल्याची माहिती जनरल फिजीशियन डॉ दिपक बैद यांनी दिली. तुमची पुरेशी झोप झालेली नसेल आणि तुम्ही थेट उन्हांच्या संपर्कात आलात तर चक्कर येण्याची दाट शक्यता आहे, अशी तंबीही त्यांनी दिली. सध्या मुंबईभरातील दवाखान्यांत याच तक्रारी येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या दिवसांत तुम्हांला थकवा येणे तसेच कंटाळा येणे साहजिकच आहे. त्यावर खास औषध उपाय म्हणून सूचवता येणार नाही. तुम्ही स्वतःहून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ बैद म्हणाले.
काय टाळाल
- थेट उन्हाच्या संपर्कात प्रवास करणे टाळा
- सुती मलमलचे कपडे परिधान करा
- फळांचा रस घेत राहा. पाण्याची बाटली सोबत ठेवा.
- तेलकट पदार्थ खाणे टाळा
- डोकेदुखीची गंभीर समस्या जाणवत असेल तर तातडीने तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा