विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या खात्यांना निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप केला. यावर उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी वाजपेयी सरकार २४ पक्षांचे होते, त्यांनी सरकार चांगले चालवले. खात्यांना पैसे दिले जातात म्हणजे ते काही वैयक्तिक नसतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी दिला असला तरी तो सर्वाधिक सेवानिवृत्त निधी आहे, असे स्पष्टीकरण दिले.
…म्हणून राष्ट्रवादीकडील खात्यांना तरतूद अधिक
राज्यातील एकूण महसुलातील ४५ हजार ५११ कोटी रुपये निवृत्ती वेतनावर होतो. २०२२-२०२३ या वर्षात १ हजार २९४ कोटी निवृत्ती वेतन खर्च होणार आहे. राज्यात १ लाख ४१ हजार कोटी निवृत्तीवेतनावर खर्च होत आहे, हे खाते राष्ट्रवादीकडे आहे. हे लक्षात का घेत नाही. उगाच निधी वाटपात भेदभाव केल्याचा मुद्दा मांडून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. सामान्य नागरिकांना वाटेल मुख्यमंत्री यांना काही कळत नाही का, वास्तविक अर्थसंकल्प तयार झाल्यावर मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर तो अंतिम होत असतो, असेही अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.
(हेही वाचा ‘द काश्मीर फाईल्स’ महाराष्ट्रात करमुक्त नाहीच! अजित पवार म्हणाले…)
विरोधक म्हणतात अर्थसंकल्प चांगला
हा अर्थसंकल्प सादर करताना तो फसवा अर्थसंकल्प आहे असे विरोधक म्हणत होते, पण विरोधकांमधीलच अनेक आमदारांचे आपल्याकडे पत्रे आली, त्यामध्ये त्यांनी अर्थसंकल्प चांगला आहे, असे म्हटले आहे. २ वर्षे राज्याने कोरोनाचा सामना केला. या काळात उत्तम काम केले, त्याचे कौतुक करतात आणि विरोधही करतात, असेही अर्थमंत्री पवार म्हणाले.
पवारांना कोरोनाच्या चौथ्या लाटेची चिंता
ज्या चीनमध्ये कोरोना वाढला, त्यात १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागला आहे. पुण्याच्या इतके मोठे शहर त्यांनी लॉकडाऊन केला आहे. चौथी लाट येऊ नये म्हणून आपण बरेच काम केले, पण लोक अजून गांभीर्यांने घेत नाहीत, असेही मंत्री पवार म्हणाले.
(हेही वाचा अजित पवारांनी केले आमदारांना खुश! ‘या’ घोषणा केल्या!)
…म्हणून मुंबईच्या निधीत वाढ
जिल्हा वार्षिक योजनेत काही ठराविक शहरांना निधी वाढवून दिला, असा आरोप झाला. हा निधी वाटताना मुंबई आणि उपनगरामधील लोकसंख्या लक्षात घेतली आहे. मुंबईत शहर आणि उपनगराची लोकसंख्या २ कोटी आहे, हे प्रमाण पाहता खूप मोठा निधी द्यावा लागेल, कालपर्यंत कमी दिला जात नव्हता, त्यामुळे येथील पायाभूत सुविधेसाठी मुंबईसाठी १९९ कोटी आणि ठाण्याला १४३ कोटी रुपये निधी वाढवून दिला आहे. ही रक्कम वाढवली याचे कौतुक झाले पाहिजे, असेही मंत्री पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community