कोट्यावधीच्या तोट्यात असणा-या महावितरणाने वीजपुरवठ्याचा महाविक्रम केला आहे. राज्यात उन्हाच्या वाढत्या झळांमुळे वीजेची मागणी सर्वाधीक आहे. या मागणीचा पुरवठा करताना, महावितरणाने वीजपुरवठ्याचा महाविक्रम नोंदवला आहे. मंगळवारी तब्बल 23 हजार 605 मेगावॅट विजेचा सुरळीत आणि अखंडित वीजपुरवठा करण्यात आला.
म्हणून वीजेची मागणी अधिक
सध्या उन्हाच्या झळा राज्याला होरपळून काढत आहेत. उन्हाने लाही लाही झाल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. या वाढत्या मागणीचा योग्य पुरवठा महावितरणाकडून करण्यात आला. याआधी 19 फेब्रुवारीला महावितरणाकडून सर्वाधिक उच्चांकी 23 हजार 286 मेगावॅट विजेचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात आला होता. त्याआधी 8 फेब्रुवारीला 23 हजार 75 तर 12 फेब्रुवारीला 23 हजार 163 मेगावॅटचा मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा करण्यात आला. सद्यस्थितीत महावितरणच्या कार्यक्षेत्रामध्ये विजेची मागणी 23 हजार ते 23 हजार 500 मेगावॅट दरम्यान स्थिरावली आहे.
( हेही वाचा :आनंदाची बातमी! स्वराज्याची राजधानी रायगडसाठी घेण्यात आला ‘हा’ निर्णय )
महावितरणाचे कौतुक
येत्या काही दिवसांत तापमानात होणा-या वाढीमुळे वीजेची मागणी 24 हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. सध्या महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तींच्या कामांना वेग देण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे. महावितरणाने केलेल्या या विक्रमी पुरवठ्याच्या कामगिरीबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री डाॅक्टर नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.
Join Our WhatsApp Community