पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात, असे असेल दोन दिवसाचे अधिवेशन

165

राज्याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार असून, कोरोना संकटामुळे हे अधिवेशन दोन दिवसाचे असणार आहे. त्यामुळे हे दोन दिवसीय अधिवेशन नेमके असणार तरी कसे याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

लक्षवेधी, तारांकित प्रश्न नसणार

कोरोना संकटामुळे यंदा पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे असून, या अधिवेशनामध्ये विधीमंडळ कामकाज तारांकित आणि लक्षवेधी प्रश्न नाहीत तसेच दीर्घकालीन चर्चाही होणार नाही. पहिल्या दिवशी अधिवेशनाचे कामकाज सकाळी ११  वाजता सुरू होईल. विधानसभा सकाळी ११ वाजता तर परिषद दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. दरम्यान विविध खात्यातील मंत्रिमंडळातील निर्णयाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी सुमारे १३ नवीन विधेयक सभागृहात मंजूरीसाठी ठेवली जातील. २०२०-२१  च्या पुरवण्या मागण्या सभागृहात बहुमतासाठी ठेवल्या जातील. विधानसभा अध्यक्ष हे नवीन तालिकापदी नावे जाहीर करतील. तर माजी राष्ट्रपत्ती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील, आमदार अनिल राठोड, सुधाकर पंत परिचारक यांच्या दु:खद निधनाबद्दल काही विधीमंडळ सदस्य पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडणार आहेत.

कोरोना- सुशांत प्रकरणावरून विरोधक सरकारला घेरणार

कोरोना संकटामुळे जरी हे अधिवेशन दोन दिवसाचे असले तरी या दोन दिवसीय अधिवेशनात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता असून, विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. तसेच राज्यातील वाढते कोरोना रुग्ण यावरून देखील सरकारला विरोधक घेणार असल्याचे समजते. एवढेच नाही तर कोविड सेंटरचा मुद्दा यावरून देखील विरोधक घेरण्याची शक्यता आहे.

अनेक आमदार गैरहजर राहणार

पावसाळी अधिवेशनात उपस्थित राहू शकत नसल्याचे बहुतांश आमदारांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून कळवले आहे. काही आमदारांनी वयाचे कारण देत अनुपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे तर काही आमदारांनी विविध आजारावर उपचार घेत असल्याचे म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाला २५ टक्के आमदारांची उपस्थिती घटेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांनाच कोरोना

अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर खुद्द विधानसभा अध्यक्षांनाच कोरोनाची लागण झाली आहे. नाना पटोले यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. ‘गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.’ असे नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.