भिवंडी कोनगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांच्या विशेष पोलीस पथकाने पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना चौघांना मुद्देमालासह मोठ्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून कोनगाव हद्दीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांसह हैद्राबाद येथील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी दिली. सदर आरोपीकडून सुमारे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
काय आहे नेमकी घटना
भिवंडी कल्याण रोड वरील पिंपळघर येथील शगुन टेक्सस्टाईल मार्केटमधील साडी दुकानाचे शटर उघडून दुकानातील अडीच लाखांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांचे विशेष पोलीस पथक निर्माण करून चौकशी सुरू केली.
या प्रकरणाची चौकशी करताना भिवंडी कोनगाव, ठाणे, नालासोपारा, वसई विरार, खालापुर या परिसरातील सीसीटिव्ही तपासून वाहनांची माहिती गोळा करून तांत्रिक माहितीव्दारे संशयित आरोपी हुसैन रफिक शेख, (वय 30) रशिद रफिक शेख, (वय 32 दोन्ही रा. चिंचोटी, ता. वसई), तबरेज दाऊद शेख (वय 39, रा, पवई व रफीकउद्दीन झहीरुद्दीन सैय्यद), (वय 32 रा. चंद्रानगर, हैद्राबाद, तेलंगणा राज्य) यांना अटक करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गुन्हयात वापरलेले ब्रिझा कार व रोख रक्कम असा 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर आरोपींनी 7 फेब्रुवारी रोजी कोनगाव ठाणे हद्दीत हरिओम स्वीट मार्ट दुकानाचे शटर उघडून घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
(हेही वाचा – आता डोंबिवली होणार प्रदूषणमुक्त! काय आहे नेमकं कारण?)
चारही आरोपी हे हैद्राबाद व इतर ठिकाणाहून चारचाकी गाडया भाडयाने घेऊन ते महाराष्ट्रातील मुंबई व आजुबाजूच्या परिसरात येऊन रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट चोरून त्या त्यांनी भाडयाने घेतलेल्या कारला लावले. यानंतर त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्यात वापर केल्याची माहिती मिळतेय. त्यांच्यावर ठाणे, मुंबई, हैद्राबाद या ठिकाणी घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे आणि राजेंद्र पवार करीत आहेत.
Join Our WhatsApp Community