केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना हक्काच्या घरासाठी क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते. यात ६ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांना २.६७ लाखांपर्यंत अनुदान मिळते. या योजनेचा लाभ आता फक्त मार्च २०२२ अखेरपर्यंतच घेता येईल, असे राष्ट्रीय आवास बॅंकेने कळवले आहे. त्यामुळे या मुदतीत संबंधितांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून २५ मार्चअखेर अनुदान प्रस्ताव राष्ट्रीय आवास बॅंकेकडे अपलोड करायचे आहे, अशी माहिती क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा यांनी दिली.
( हेही वाचा : आता डोंबिवली होणार प्रदूषणमुक्त! काय आहे नेमकं कारण? )
प्रधानमंत्री आवास योजना अंतिम टप्प्यात
सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २.६७ लाखांचे अनुदान देणारी योजना जाहीर केली होती. २०२२ पर्यंतचे उद्दीष्ट यासाठी ठेवण्यात आले होते. आता सदर योजना अंतिम टप्प्यात आली आहे. गृहकर्ज प्रस्ताव मंजूर करून अनुदान अर्ज २५ मार्च २०२२ पर्यंत अपलोड करणे आवश्यक आहे. या मुदतीनंतरचे प्रस्ताव स्विकारले जाणार नसल्याने उशीर करणाऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते, म्हणूनच राष्ट्रीय आवास बॅंकेने सदर निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे घर घेण्याच्या तयारीत असलेल्यांनी तातडीने बिल्डर तसेच बॅंकांशी संपर्क साधावा व सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून निर्धारित मुदतीत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रेडाई अहमदनगरच्या वतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community