अर्ध्या बँका सरकारमधील पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या, दरेकरांचा घणाघात!

196

या कारवाईला मी मुळीच घाबरलेलो नाही. चोरी करेल तो घाबरेल ना. कोणी चुकीचे करत असेल, तर कारवाई झाली पाहिजे. पण ती कारवाई सूडबुद्धीने नको. माझ्यावरील कारवाई सूडबुद्धीने झाली आहे. यांची राज्य सहकारी बँक असेल, मध्यवर्ती बँक असेल, बोगस कर्जे दिली आहेत. त्याचा लेखाजोखा मी विधीमंडळात मांडणार आहे. यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, त्या स्वत:साठी, आपल्या सगेसोयऱ्यांसाठी, आपल्या बागलबच्यांसाठी कशा वापरल्या गेल्या आहेत, कशी स्वत:ची कर्जे माफ करत आहेत. या सगळ्या गोष्टींची मांडणी मी करणार आहे. अर्ध्या बँका सरकारमधील पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या आहेत. स्वत: चोरी करायची आणि साप साप म्हणून भुई थोपटायची असा हा प्रकार आहे, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

म्हणून न्यायालयाने दिला दिलासा 

दरेकर सातारा दौऱ्या दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माननीय सत्र न्यायालयाचे मी आभार व्यक्त करतो. विरोधी पक्षनेता म्हणून सरकारचे वाभाडे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी मी काढत होतो. त्याचा सूड उगवायचा म्हणून, अशा प्रकारची कारवाई ज्यामध्ये काही तथ्य नाही, ती करण्याचा सरकारचा प्रयत्न होता. आम्ही सन्माननीय न्यायालयाला पटवून दिले आणि आम्हाला सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने दिलासा दिला आहे.

यावर सरकार कारवाई करणार का?

जिल्हा बँक एकच बँक नाही. सातारा बँक आहे, पुणे जिल्हा बँक आहे, सांगली जिल्हा बँक आहे, कोल्हापूर जिल्हा बँक आहे. अर्ध्या बँका सारकारमधील पुढाऱ्यांनी विकून खाल्ल्या आहेत. आता सगळ्या गोष्टीचा हिशेब चुकता होणार आहे. राज्यामध्ये सुमारे १५ ते २० हजार मजूर संस्था आहेत. प्रत्येकी २५ सदस्य आहेत. साधारणत: अडीच-तीन लाख लोकांवर गुन्हे दाखल करणार आहात का? त्यामध्ये ९० टक्के लोकं राष्ट्रवादीची आहेत. जे संचालक आहेत, लेबर फेडरेशनचे लोक आहेत. जे जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करत आहेत. त्याची भाजपने आकडेवारी गोळा केली आहे, त्यांच्यावर कारवाई करणार का, हेच मी सरकारला विचारणार आहे.

याचा हिशोब द्यावा लागेल

मी चार जिल्हा मध्यवर्ती बँकांची माहिती मागवली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक. ज्या दहा कारणांसाठी मुंबई बँकेची चौकशी लावली, त्या १० कारणांची मला या जिल्हा बँकांची माहिती द्या. रजिस्ट्रेशन करणारे तुमचे सहकार खातेच असते. दरवर्षी तुमचे इन्सपेक्शन होत असते, ऑडिट होत असते, इतके दिवस तुमचे सहकार खाते झोपा काढत होते काय, असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, दुसऱ्यावर दगड मारताना आपल्या संस्था काय करत आहेत, याचाही हिशोब राज्यातील जनतेला द्यावा लागणार आहे. मुंबई बँक १२०० कोटीवर होती ती आम्ही आल्यावर १० हजार कोटींवर गेली. बँक आम्ही डुबवली नाही, लिक्विडेशनमध्ये गेली नाही. बँकेचा फयदा माझ्या कुठल्या संस्थांना देण्याचा प्रयत्न केलेला नाही. तुमच्या बँकांचे तसे नाही. सांगली जिल्हा बँक ७५ कोटी माफ करत आहे. ते कुणाचे माफ करत आहेत, पुढाऱ्यांच्या संस्थांचे ना,  याचा हिशेब तुम्हाला द्यावा लागणार. प्रविण दरेकरकडे एक बोट दाखवले ना, चार बोटे तुमच्याकडे आहेत, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

( हेही वाचा :‘द काश्मीर फाईल्स’ बाबत ममता बॅनर्जी बरळल्या, म्हणाल्या…)

हे तर राजकारणाचे अड्डे 

राज्यातील जनतेमध्ये आणि सहकारी संस्थांमध्ये जो काही हैदोस या पुढाऱ्यांनी मांडला आहे.  कारखाने, जिल्हा बँक, पणन संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ असतील हे तुमचे राजकारणाचे अड्डे झालेत. तुम्हाला पोसण्याची ही संस्थाने झाली आहेत. या सगळ्याची माहिती भाजप घेत आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.