राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे इडीच्या अटकेत असल्याने, त्यांच्याकडील मुंबई अध्यक्षपद काढून घेत, त्या पदावर अन्य व्यक्तीची निवड केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदी सक्षम व्यक्तीची निवड करणे आवश्यक असल्याने, या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु होण्याची शक्यता आहे. या पदासाठी महापालिकेच्या गटनेत्या असलेल्या राखी जाधव यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांना २२ वर्षे नगरसेवकपद भूषवलेल्या आणि महापालिकेचे खडानखडा माहिती असलेल्या माजी नगरसेवक रवी पवार यांच्यासह मुंबई बँकेचे शिवाजीराव नलावडे, नरेंद्र राणे तसेच नवाब मलिक यांची बहिण डॉ.सईदा खान यांचीही नावे चर्चेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेशी जुळवून घेणाऱ्या या सर्व नेत्यांपैंकी कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राखी जाधव यांचं वजन अधिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे प्रमुख आधारस्तंभ असलेले माजी आमदार सचिन अहिर आणि माजी खासदार संजय पाटील यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. परंतु या दोघांनीही मुंबई अध्यक्ष असलेल्या नवाब मलिक यांना कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याची पक्षातच चर्चा आहे. परंतु आता नवाब मलिक हे ईडीच्या अटकेत असल्याने, त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार नसला, तरी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई अध्यक्षपदी दुसऱ्या व्यक्तीची वर्णी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने घेतल्यास या पदावर सक्षम व्यक्तीची निवड करावी लागणार आहे. मुंबई महापालिकेच्या माजी गटनेत्या राखी जाधव यांचे पक्षातील वजन अधिक असून शिवसेनेत गेलेल्या दोन्ही भाऊंची कृपाही त्यांच्यावर आहे. खुद्द पक्षातील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांच्या मर्जीतील राखी जाधव असल्याचे बोलले जात आहे.
‘या’ नावांची होतेय चर्चा
मात्र, जाधव यांच्या तुलनेत २२ वर्षे नगरसेवक पद भूषवणाऱ्या आणि महापलिकेचे गटनेतेपद भूषवणाऱ्या माजी नगरसेवक रविंद्र पवार हेही तेवढेच उजवे ठरणार आहे. पवार यांचे महापालिकेतील ज्ञान आणि संघटनात्मक बांधणीतील अनुभव लक्षात घेता जाधव यांच्यासमोर पवार यांचे आव्हान राहणार आहे. मात्र, पवार यांच्याबरोबरच सर्वात अनुभवी असलेले शिवाजीराव नलावडे हेही या पदाला न्याय देऊ शकतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला घेता येऊ शकतो. याबरोबरच श्री सिध्दी विनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषणवणाऱ्या नरेंद्र राणे यांच्यासह संतोष धुवाळी, अजित रावराणे आणि डॉ. सईदा खान यांचीही नावे चर्चेत आहे. केवळ विद्यमान महापालिकेच्या गटनेत्या म्हणून राखी जाधव यांच्या नावाचा विचार झाल्यास त्या तुलनेत रविंद्र पवार अनुभवी असल्याने त्यांचे पारडे जड ठरणारे आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाधव यांचे पारडे जड असल्याने, त्यांची वर्णी लावली जाण्याची शक्यता असली, तरी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून नक्की कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Join Our WhatsApp Community