कोविडमुळे थांबलेली प्लास्टिक कारवाई जोरात! ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

110

मुंबईत जून २०१८ पासून प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई सुरू झाल्यानंतर मागील मार्च २०२० कोविडच्या पार्श्वभूमीवर ही दंडात्मक कारवाई बंद होती. परंतु मागील डिसेंबरपासून पुन्हा एकदा ही कारवाई सुरू झाली असून मार्च २०२० ते जानेवारी २०२२ पर्यंत तब्बल ७१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

‘या’प्‍लास्टिकच्या वापरावर बंदी 

महाराष्‍ट्र शासनाच्‍या दिनांक २३ मार्च २०१८ च्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात प्रतिबंधित प्‍लास्टिकवर (उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्रतिबंधित प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणा-या पिशव्या (हॅण्‍डल असलेल्या व नसलेल्या), प्‍लास्टिकपासून बनविण्यात येणार्‍या व एकदाच वापरल्या जाणार्‍या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्‍यादीसह हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्‍या प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्‍यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्‍लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

(हेही वाचा – रस्त्यांवरील बेवारस वाहनांविरोधात पुन्हा महापलिका इन ऍक्शन!)

प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा वापर नागरिकांनी करु नये, यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेद्वारे नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येते. तसेच प्रत‍िबंधित प्‍लास्टिकचा वापर करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. यानुसार जून २०१८ ते जानेवारी २०२२ या सुमारे ४३ महिन्यांच्या कालावधीत मुंबईत करण्यात विविध ठिकाणच्या कारवाई दरम्यान १ लाख ७५ हजार ४२८ किलो प्लास्टिक जप्त करण्यात येऊन यापोटी ५ कोटी ३६ लाख ८५ हजार इतकी दंड वसुली करण्यात आल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.

८६ हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त

तर या कारवाईला सुरुवात झाल्यावर म्हणजे जून २०१८ पासून प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यापासून मार्च २०२० पर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकांनी मुंबईत सुमारे १६ लाख आस्‍थापनांना भेटी देऊन जवळपास ८६ हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त केला होता. तर त्याअंतर्गत सुमारे ४ कोटी ६५ लाख रुपयांचा दंडही वसूल केला होता. परंतु पुढे कोविडनंतर आजतागायत प्लास्टिक विरोधी कारवाई पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे तत्कालीन महापलिका सहआयुक्त निधी चौधरी यांनी केलेल्या धडक कारवाईतूनच ४ कोटी ६५ लाखाचा दंड वसूल करता आला होता. त्यामुळे कोविड काळात थांबलेली कारवाई आणि त्यानंतर या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर केवळ ७१ लाखांचा दंड वसूल करता आलेला आहे.

प्रशासनाने केले आवाहन

अधिक चांगल्या पर्यावरणासाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने करण्यात येत असलेल्या विविध स्तरिय कार्यवाहीचा भाग म्हणून ‘प्रतिबंधित प्लास्टिक’ विरोधी कारवाई आता अधिक प्रभावी करण्यात येत आहे. तरी कृपया सर्व नागरिक, व्‍यापारी, फेरीवाले व सर्व संबंधितांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करु नये. जेणेकरुन, महानगरपालिकेला रुपये ५ हजार ते रुपये २५ हजार पर्यंतची दंडात्मक कारवाई सारखी अप्रिय कारवाई टाळता येईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास ही होईल शिक्षा

*प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्‍या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्‍या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.