नाशिककरांना लवकरच मिळणार दिलासा!

141

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली असून ती नियंत्रणात आली आहे. तसेच नाशिक शहारी भागातील लसीकरणाचे प्रमाण देखील 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने शहरी भागातील कोरोनाचे निर्बंध उठविण्यासाठी येत्या दोन दिवसांत होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या असून ग्रामीण भागातील निर्बंध मात्र अजून काही दिवसांसाठी तसेच कायम ठेवण्यात आले आहेत, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

अर्थचक्र अधिक गतीमान होणार

नाशिक जिल्ह्यातील लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. जेणे करून राज्यातील इतर चौदा जिल्ह्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील निर्बंध खुले होण्यासाठी मदत होवून जिल्ह्यातील अर्थचक्र अधिक गतीमान होईल. ग्रामीण भागातील ज्या नागरिकांनी बाहेर गावी लसीकरण केले आहे, त्यांची नोंद देखील आपल्या जिल्ह्यातंर्गत करण्यात यावी. ज्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाचे प्रमाण वाढून तेथील निर्बंध उठविण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

(हेही वाचा – कोरोनाचा पुन्हा धोका! केंद्राचा पत्राद्वारे राज्यांना इशारा; दिल्या ‘या’ महत्त्वपूर्ण सूचना)

नाशिक जिल्ह्यात तयार करण्यात आलेला ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून कोरोनाचा एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. त्यामुळे उपलब्ध ऑक्सिजनचा आवश्यकतेनुसार वापर इतर रुग्णांसाठी करण्यात यावा. तसेच ऑक्सिजन निर्मीतीसाठी जे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत, त्या मशिनरीचा वापर देखील नियमितपणे करण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या वारसांना शासनामार्फत 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येते, यासाठी जिल्ह्यातून 15 हजार 233 अर्जांपैकी 9 हजार 664 अर्ज मंजूर करून त्यांचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तसेच एकूण प्रस्तांवापैकी 4 हजार 486 प्रस्तावांची तपासणी सुरू असून 1 हजार 83 प्रस्ताव नामंजूर करण्यात आले असल्याचीही माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिली.

पारंपारिक राहाट रंगपंचमी महोत्सवासाठी परवानगी

बैठकीसाठी उपस्थित महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोरोना सद्यस्थितीची माहिती पालकमंत्री भुजबळ यांना सादर केली. नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या पारंपारिक राहाट रंगपंचमी महोत्सवासाठी परवानगी देण्यात आली असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीच्या वेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना सद्यस्थितीबाबात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.