सातारा येथील कराड भागांत मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतक-यावर गुरुवारी बिबट्याने हल्ला केला. रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी (५५) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतक-याचे नाव आहे.
बिबट्या शेतात पिल्लांसोबत असताना केला हल्ला
हल्ले करणारी बिबट्या मादी असून, शेतात पिल्लांसोबत होती. त्यामुळे आपल्या पिल्लांना धोका असल्याचा भास होताच तिने रामचंद्र सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. पिल्ले लहान असताना त्यांना धोका जाणवल्यास कित्येकदा वन्यप्राण्यांकडून माणसावर हल्ला झाल्याची याआधीही अनेक उदाहरणे आहेत.
काय आहे घटना?
गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास रघुनाथ सूर्यवंशी कडी नावाच्या शिवारात जनावरांसाठी वैरण आणण्याासाठी गेले होते. कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बिबट्या होता. मात्र सूर्यवंशी यांना बिबट्याच्या वावराची कल्पना आली नाही. मादी बिबट्याने अचानक सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने सूर्यवंशी यांच्या हातावर, मानेवर, तोंडावर व पोटावर पंजा मारुन त्यांना जखमी केले. सूर्यवंशी यांनी आरडाओरड करताच मादी बिबट्याने धूम ठोकली. सूर्यवंशी यांचा उपचारासाठी तातडीने कराडला रवाना करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच वनाधिका-यांनी घटनास्थळाला भेट दिली. सूर्यवंशी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वनाधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community