शाकाहार आणि मांसाहार यामध्ये चांगला व आरोग्यदायी आहार कोणता याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये सतत चर्चा सुरू असते. या विषयावर अनेकदा #vegan #nonveglover असे ट्वीटर ट्रेंड होताना देखील आपण पाहिले आहेत. परंतु नव्या संशोधनात शाकाहार मासांहारापेक्षा श्रेष्ठ ठरला आहे. वर्ल्ड कॅन्सर रिसर्च फंड, ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थ या संस्थांनी केलेल्या संशोधनातून शाकाहारी लोकांना कर्करोग होण्याच्या धोक्याचे प्रमाण तब्बल १४ टक्के कमी असते असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यावेळी ४ लाख ७२ हजार लोकांच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यात आले. यावर आधारित प्रबंध बीएमसी मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.
( हेही वाचा : आनंदी देशांच्या यादीत सलग पाचव्यांदा ‘फिनलँड’ अव्वलस्थानी! जाणून घ्या भारताचा क्रमांक )
शाकाहार अधिक उपयुक्त
जगातील अनेक डॉक्टर शाकाहाराला प्राधान्य देताना दिसतात. तज्ज्ञांच्या मते, शाकाहारामुळे शरीरातील रक्तदाब, कोलेस्ट्रॉल पातळी सामान्य राहण्यास मदत होते. डायबेटीस, स्थूलपणा अशा आजारांना दूर ठेवण्यासाठी शाकाहार अधिक उपयुक्त आहे.
संशोधन करताना तीन गट तयार करण्यात आले. यामध्ये एका गटात आठवड्यातून ५ किंवा जास्तवेळा मांसाहार घेतात अशा लोकांचा समावेश करण्यात आला. दुसऱ्या गटात जे लोक जेवणात आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा कमी मांसाहाराचा समावेश करतात असा गट तयार केला गेला. तर, शाकाहारी लोकांचा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.
कर्करोग होण्याच्या धोक्याचे प्रमाण तब्बल १४ टक्के कमी
या संशोधनानुसार मेनोपॉजनंतर ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका शाकाहारी महिलांमध्ये १८ टक्क्यांनी कमी होतो. नियमित मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत कमी मांस खाणाऱ्यांना कॅन्सरचा धोका २ टक्क्यांनी कमी आहे. फक्त मासे खाणाऱ्यांना हा धोका १० टक्के कमी तर शाकाहार करणाऱ्यांना कर्करोग होण्याच्या धोक्याचे प्रमाण तब्बल १४ टक्के कमी असते. तर, कोलेस्ट्रॉल कॅन्सर होण्याची शक्यता शाकाहारी आहारामुळे २२ टक्क्यांनी कमी होते. असे संशोधनात आढळून आले आहे.
Join Our WhatsApp Community