गुजरातमधील भाजपचे मुख्यमंत्री जितू वाघानी यांनी इयत्ता ६ वी ते १२ च्या अभ्यासक्रमात श्रीमद् भगवद् गीतेचा समावेश करण्याची घोषणा केली होती. गुजरात सरकार यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून श्रीमद् भगवद् गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करणार आहे. गुजरात सरकार पाठोपाठ कर्नाटक सरकारनेही श्रीमद् भगवद् गीतेतच अभ्यासक्रमात समावेश करण्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही श्रीमद् भगवद् गीतेचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
भाजपची मागणी
गुजरात सरकारने अतिशय उत्तम निर्णय घेतला आहे. श्रीमद् भगवद् गीता हे जगण्याते सूत्र असून, महाराष्ट्र सरकारने सुद्धा गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अशा संत साहित्यांचा शालेय शिक्षणात समावेश केला पाहिजे. जेणेकरून भावी पिढीला उत्तम संस्कार आणि महाराष्ट्राची परंपरा याचे ज्ञान मिळेल. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता श्रीमद् भगवद् गीता आणि संत साहित्यांचा शालेय शिक्षणात समावेश करावा, अशी मागणी भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
( हेही वाचा : शिक्षण आयुक्तांकडून अधिकाऱ्यांची ‘झाडाझडती’ सुरू )
कर्नाटक राज्याच्या शिक्षणमंत्र्यांचे संकेत
गुजरात पाठोपाठ कर्नाटक राज्यातही शालेय शिक्षणात गीतेचा समावेश केला जाऊ शकतो, असे संकेत कर्नाटक राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी दिले. श्रीमद् भगवद् गीता ही केवळ हिंदूंसाठी नसून सर्वांसाठी आहे, त्यामुळे समिती स्थापन करून याचा निर्णय लवकरच होईल असे बी.सी. नागेश यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community