मालकी हक्काचे घर नाही तर मतही नाही! सफाई कामगारांनी पुकारला एल्गार

164

सफाई कामगारांच्या सेवा निवासस्थानांचा पुनर्विकास केला जात असला तरी आम्हाला आश्रय योजनेतील घरे नको तर मालकी हक्काची घरे हवी, असा सूर आता सफाई कामगारांनी आळवला आहे. नगरसेवक आणि आमदारांनी आता सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावी यासाठी प्रयत्न करायला हवा. जर या मागणीसाठी राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक, आमदार यांनी एकमुखी पाठिंबा दिला नाही, तर येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ‘मालकी हक्काचे घर नाही, तर मत नाही’ अशी भूमिकाच सफाई कामगार घेणार असल्याचे सांगत म्युनिसिपल मजदूर युनियनने या निवडणुकीवर सफाई कामगार बहिष्कार घालणार असल्याचा इशाराच दिला आहे.

आझाद मैदानात मोर्चा काढलेला 

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील त्यांच्या बंगल्यावर रविवार, १३ मार्च २०२२ रोजी म्युनिसिपल मजदूर युनियनचे चर्चा केली होती. सफाई कामगारांच्या मालकी हक्कांच्या घरांसाठी निश्चित चांगला निर्णय घेऊ, असे आश्वासन आमच्या संघटनेला दिले होते. परंतु विधान भवनाच्या सभागृहामध्ये लक्षवेधी सुचनेला उत्तर देताना, मुंबईच्या सफाई कामगारांना आश्रय योजनेद्वारे सुरूवातीला १२ हजार घरे देणार असल्याची माहिती सभागृहामध्ये दिलेली आहे. दरम्यान उन्हाळी अधिवेशन आहे हे लक्षात घेऊन सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून १४ मार्च २०२२ रोजी आझाद मैदान येथे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी मोर्चा काढला होता. परंतु या गंभीर विषयावर एक ते दोन आमदार सोडले, तर कोणीही सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवला नाही, अशी खंत म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अशोक जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकात व्यक्त केली.

(हेही वाचा कोस्टल रोडमुळे मुंबईत सर्वात मोठा समुद्र पदपथ होणार)

मालकी हक्काचे घर नाही तर मत नाही

सफाई कामगारांना आश्रय योजनेद्वारे घरे नकोत, असे सांगत जाधव यांनी सिद्धार्थनगर बाप्टी रोड, मिठानगर येथे वसाहतीमध्ये राहणारे कामगार ७० वर्षांपासून राहत असून घास गल्ली, मॅन्टरोड येथे १९३७ सालापासून रहाणारे कामगार, छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या बाजूला असलेल्या वसाहतीमध्ये ९० सालापासून राहणाऱ्या सर्व कामगारांना अगोदर मालकी हक्काची घरे दिलीच पाहिजेत. तसेच सर्वच्या सर्व म्हणजे २९,६१८ कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेद्वारे घरे मिळालीच पाहिजेत अशी मागणी अशोक जाधव यांनी केली आहे. जर का सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांसाठी राजकीय पक्षाचे माजी नगरसेवक, आमदार यांनी सफाई कामगारांच्या मालकी हक्काची घरे मिळावी या मागणीला एकमुखी पाठिंबा दिला नाही, तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये ‘मालकी हक्काचे घर नाही तर मत नाही’ अशीच सफाई कामगार भूमिका घेणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने देण्यात आली आहे.

फक्त ५,५९२ सफाई कामगारांना सेवानिवासस्थाने

ज्या ज्या वेळी आपल्या देशावर नैसर्गिक संकटे आली त्या-त्या वेळी हाच सफाई कामगार ओरीसा राज्याला महापुराने वेढले त्यावेळी धावून गेला. गुजरातला भूकंप झाला त्यावेळी सफाई कामगार धावून गेला. २०१९ साली आणि २०२१ साली सांगली, कोल्हापूर, महाड, चिपळूण येथे महापूर आला त्यावेळीच हाच सफाई कामगार जनतेच्या सेवेसाठी धावून गेला. परंतू मुंबईच्या सफाई कामगारांसाठी, त्यांच्या मालकी हक्कांच्या घरासाठी कोणीही धावून आले नसल्याची खंत मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष जाधव यांनी काढलेल्या पत्रकामध्ये आरोप केलेला आहे. मुंबई महापालिकेमध्ये साफसफाई खात्यामध्ये एकूण २९,६१८ कायम कामगार काम करीत असून फक्त ५,५९२ सफाई कामगारांना सेवानिवासस्थाने दिलेली आहेत. अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्या सफाई कामगारांचा फक्त कामापूरता मामा करून घेतला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.