पिंज-यांत डांबून लोकलमार्गे अवैध विक्रीसाठी नेल्या जाणा-या ८० पोपटांची वनविभागाच्या अधिका-यांनी सुटका केली. मोहम्मद नाझेर (२५) असे पोपटांची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने अमरावतीहून ठाण्याला येणा-या रेल्वेतून ८० पोपट पिंज-यांत डांबून त्यावर कापड गुंडाळून आणले होते.
आरोपीला कोठडी
वनाधिका-यांनी सापळा रचून आरोपी मोहम्मद नाझेरकडून ८० पोपट हस्तगत केले. आरोपी हा वाशिम येथे राहणारा आहे. ही कारवाई १३ मार्च रोजी केली गेली. आरोपीला सुरुवातीला वनकोठडी दिली गेली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर काही दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे.
पोपट सुरक्षित हातात
या कारवाईनंतर वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनकडे पोपट सांभाळण्यास दिले आहेत. रेल्वे प्रवासात पोपटांना काहीच खाल्ले दिले नसल्याचे, वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनकडून सांगण्यात आले. ८० पैकी काही पोपटांची पिल्ले आहेत. त्यांची आम्ही देखभाल करत असल्याची माहिती असोसिएशनने दिली.
( हेही वाचा :विद्यार्थी असतील आता दुपारच्या आत घरात )
पोपट पाळणे गुन्हा
गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने ही कारवाई केली. पोपट हा भारतीय वन्यजीव संवर्धन कायदा १९७२ नुसार चौथ्या वर्गवारीत संरक्षित आहे. पोपट पाळता येत नाही, पोपटाची विक्री करणेही गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड तसेच तुरुंगवासाची तरतूद असल्याचे, ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community