मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे, असे विधान करत लवकरच महाराष्ट्र पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. ते असेही म्हणाले की, आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचे आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर टीका केली. आजारपणामुळे नाईलाजाने विश्रांती घ्यावी लागल्याने झालेल्या टीकेला यावेळी अप्रत्यक्षपणे उत्तर देत विरोधकांना त्यांनी एक प्रकारे इशारा दिला. तसेच शिवसैनिकांना कामाला लागा, असे आवाहन करत त्यांच्यात जोश निर्माण करण्याचा प्रयत्नही केला.
गावागावात होणार शिवसेनेची बांधणी!
येत्या 22 मार्चपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना त्यांनी आपण लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचे सांगितले. दोन वर्षात लोकसभा निवडणुका आल्या असल्याने त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्यात.
(हेही वाचा – ‘त्या’ पाकिस्तानी एजन्टसाठी ‘बेस्ट’ भंगारात काढल्या? शेलारांचा सेनेला सवाल)
काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांना आवाहनही केले. ते म्हणाले, राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. या सर्वांना आपण तोंड देत आहोत. मला एका जागी बसावं लागत आहे. पुण पुढच्या काही दिवसात मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल. तुमची साथ आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून राज्याचे काम पुढे नेत आहे. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आजी माजी नगसेवक यासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदारांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. शिवसेनेचे विचार गावा गावात पोहोचवणे गरजेचे आहे. सत्ता आल्यानंतर निखाऱ्यावर जमलेल्या राखेवर फुंकर मारणं गरजेचं असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. शिवसेनेने काही मतदारसंघात पक्ष वाढवणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
कोणावर असणार शिवसंपर्क अभियानाची जबाबदारी
- संजय राऊत – नागपूर
- अरविंद सावंत- यवतमाळ
- श्रीकांत शिंदे – गडचिरोली
- गजानन कीर्तिकर- अमरावती
- खासदार हेमंत पाटील- अकोला
- संजय जाधव – बुलढाणा
- खासदार प्रताप जाधव- वाशीम
- प्रियांका चतुर्वेदी- भंडारा
- खासदार कृपाल तुमाणे- वर्धा