गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच चर्चेत आहे. महाविकास आघाडी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. यावेळी दानवेंनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडी सरकारच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडीतील काही आमदारांनी आमच्याकडे सरकारच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी कधीतरी उफाळून येईल आणि योग्य वेळ आल्यावर ते सर्वांसमोर येतील असा दावा दानवे यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारला रावसाहेब दानवेंनी आक्रमक इशारा देताना म्हटले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये सत्यता आहे. पेन ड्राइवमध्ये सत्यता नव्हती तर मग अॅड. प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? आगामी काळात आम्ही आणखी चार पेनड्राइव्ह बाहेर काढू. या दाव्यामुळे महाविकास आघाडीतून एकच खळबळ उडवून दिली आहे.
दानवेंचा शिवसेनेवर निशाणा
एमआयएम महाविकास आघाडीसोबत आली आणि गेली काय, याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमचा मुद्दा शिवसेनेपर्यंत आहे. ज्या दिवशी शिवसेनेने भाजपशी दगाफटका केला त्याच दिवशी त्यांनी भगवा सोडून हिरवा पांघरला होता, असे म्हणत दानवेंनी शिवसेनेवर निशाणा साधला.
(हेही वाचा – भाजप, महाविकास आघाडीची बेरीज-वजाबाकी; किती येणार, किती जाणार?)
काय म्हणाले होते दानवे?
राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला होता. पण शिवसेनेने जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांच्यातला भगवा रंग संपुष्टात येऊन, त्यांनी हिरव्याचं पांघरुण पांघरुन घेतलं आहे. त्यामुळे शिवसेना आता हिरव्याचं समर्थन करत असल्याचे सांगत, महाविकास आघाडीतील काही आमदार नाराज असून ते आपल्या संपर्कात असल्याचे दानवे म्हणाले. इतकंच नाही तर हे आमदार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर देखील बहिष्कार घालणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली. पण निवडणुका जवळ येताच हे 25 आमदार नक्कीच भाजपमध्ये येतील, असे सूचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.