उष्णतेच्या लाटांचा प्रकोप कमी झाला असताना तब्बल आठवड्याभरानंतर मुंबईकरांनी आता आल्हाददायक सकाळ अनुभवायला मिळत आहे. सोमवारी दिवसभरात मार्च महिन्यात मुंबईकरांना पावसाच्या हलक्या सरी भेटीला येतील, वातावरणही ढगाळ राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.
रविवारीही ढगाळ वातावरणाच्या प्रभावानंतर आता शहरांतील अंतर्गत भागांतील कमाल तापमान ओसरण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात चाळीशीपार गेलेले मुलुंड आणि पवईत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले.
किनारपट्टीवरील कुलाबा आणि सांताक्रूझ येथील वेधशाळा केंद्रात कमाल तापमानात कमालीची घट नोंदवली गेली. कुलाब्यात ३०.६ तर सांताक्रूझमध्ये ३१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. कुलाबा वेधशाळा नजीकच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरही ३०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शहरभागांत कमाल तापमान एक ते चार अंशाने जास्त होते. माटुंग्यात ३१.१, सायनमध्ये ३२, राममंदिर येथे ३२.४, घाटकोपरमध्ये ३२.५, चेंबूरमध्ये ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारीही कमाल तापमान ३१ तर किमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.