बेस्टच्या ताफ्यात आणखी ४ हजार इलेक्ट्रिक बसेस येणार!

176

मुंबई सारख्या महानगरात मुंबईकर बेस्ट बसेसवर अवलंबून असतात. महानगरात प्रवासासाठी महत्त्वाचे साधन म्हणून बेस्टच्या बसेसकडे पाहिले जाते. दरम्यान, इंधन दरवाढीला पर्याय व पर्यावरण पूरक प्रवासासाठी बेस्टकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, बेस्टच्या ताब्यात येत्या काही वर्षात ४ हजार इलेक्ट्रिक बसेसचा ताफा असणार आहे. त्याबाबत विविध स्तरावर नियोजन करण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

चांगली, किफायतशीर बससेवा देण्याचा प्रयत्न 

मुंबईसारख्या मोठ्या शहरात प्रदूषण ही मोठी समस्या आहे. यामुळे अनेक समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक बसमुळे शहरातील प्रदूषण कमी होऊन मुंबईकराना चांगली आणि किफायतशीर बससेवा देण्याचा प्रयत्न बेस्टकडून सुरू आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्यानुसार डिझेलवरील बसेस या सीएनजीवर किंवा इलेक्ट्रिकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी किती खर्च येईल, तसेच या बसगाड्यांची किंमत याच्या आकडेवारीचा बेस्ट प्रशासन विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणतात शिवजयंती तिथीनुसार, सरकार मात्र तारखेवरच ठाम! )

इंधन दरवाढीचा बेस्टला बसतोय फटका पण…

इंधन दरवाढ सातत्याने होत असल्याने बेस्ट उपक्रमाला त्याचा फटका बसत आहे. असे असले तरी प्रवाशांना मात्र त्याचा भुर्दंड बसू नये यासाठी भविष्यात इलेक्ट्रिक बसेसचा अधिकाधिक वापर करण्याचे बेस्टने ठरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बेस्ट वापरत असलेल्या डिझेलच्या फेऱ्यांचा खर्च प्रति किलोमीटर चाळीस रुपये आहे. तर सीएनजीवर चालणाऱ्या बसचा प्रवर्तन खर्च प्रति किमी २६ रुपये आहे. तर इलेक्ट्रिकवर बसगाड्यांचा प्रवर्तन प्रति किमी ९ रुपये इतका खर्च येतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.