पाण्याच्या टाक्या डास अळीमुक्त करण्यासाठी ४० दिवसांची डेडलाईन

110

मुंबईला मलेरिया आणि डेंग्यूमुक्त करण्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय, निम-शासकीय यंत्रणांनी आपापल्‍या अखत्‍यारितील कार्यालये व परिसरांमध्‍ये पाण्‍याच्‍या टाक्‍या डास प्रतिबंधक करण्यासाठी तसेच निकामी-भंगार साहित्‍याची विल्‍हेवाट लावणे पुढील ४० दिवसांची डेडलाईन दिलेली आहे. येत्या ३० एप्रिल २०२२ पूर्वी ही सर्व कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच कोठेही पाणी साचून डासांची उत्‍पत्‍ती होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

( हेही वाचा : पाणी जपून वापरा! ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद )

डास निर्मूलन समितीची सभा

येत्‍या पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर, मुंबईत हिवताप (मलेरिया), डेंगी व तत्‍सम आजारांना प्रतिबंध म्‍हणून महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य विभाग व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत. त्‍याचा एक भाग म्‍हणून मुंबईतील डास निर्मूलन समितीची सभा या समितीचे अध्यक्ष तथा महानगरपालिका आयुक्‍त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सोमवारी दुपारी झाली. त्याप्रसंगी त्यांनी संबंधित प्राधिकरणे, संस्था आदींच्या सदस्यांशी संवाद साधतांना त्यांनी हे निर्देश दिले आहे.

या सभेस बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांच्‍यासह राज्‍य सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्‍य रेल्‍वे, पश्चिम रेल्‍वे, म्‍हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्‍ट, लष्कर, नौदल, वायूदल, सैन्‍यदल अभियांत्रिकी सेवा, बेस्‍ट, डाक विभाग, एमटीएनएल, बीएसएनएल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अशा शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे मिळून ५१ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

यंत्रणांचे सहकार्य आवश्‍यक

सर्व शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणांच्‍या हद्दीतील मालमत्तांसह कार्यालय परिसरांमधील पाणी साठवण्याच्‍या टाक्‍या, शासकीय परिसरांमध्‍ये असलेले निकामी, निकृष्‍ट व भंगार साहित्‍याची ठिकाणे याबाबत केलेल्‍या सर्वेक्षणाची सांख्यिकी माहिती यावेळी महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सादर केली. तसेच छायाचित्रांसह संगणकीय सादरीकरणही केले. ज्या-ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या अद्याप डास प्रतिबंधक करण्यात आलेल्या नाहीत, त्‍याबाबतची योग्‍य कार्यवाही करण्‍याच्‍या सूचना या यंत्रणांना करण्‍यात आल्‍याचेही नारिंग्रेकर यांनी नमूद केले. तसेच पाणी साचून डासांची उत्‍पत्‍ती होवू नये, यासाठी आवश्‍यक असलेल्‍या उपाययोजना दरवर्षी कशा केल्‍या जातात, त्‍याची माहितीही त्‍यांनी दिली.

( हेही वाचा : पुण्यात ‘कशा’साठी लागतेय वाहनांची रांग! )

मुंबई महानगरामध्‍ये मागील काही वर्षांमध्‍ये हिवताप व डेंगी तसेच तत्‍सम आजार रोखण्‍यासाठी करण्‍यात येत असलेल्‍या उपाययोजनांची माहिती देत कार्यकारी आरोग्‍य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी या आजारांना रोखण्‍यासाठी नागरिकांसमवेतच सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य आवश्‍यक असल्याचे सांगितले. मुख्‍यत्‍वाने डासांची उत्‍पत्‍ती रोखणे, हा मूळ उद्देश असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

आयुक्तांनी दिले निर्देश

ज्‍या यंत्रणांच्‍या हद्दीत पाणी साठवण्‍याच्‍या जागा व टाक्‍या यांचे डास प्रतिबंधन शिल्‍लक आहे, निकामी व भंगार साहित्याची विल्‍हेवाट लावलेली नाही, त्‍यांनी त्‍वरेने कार्यवाही सुरु करावी. ३० एप्रिल २०२२ पर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. संबंधितांनी ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्याची छायाचित्रे व्हॉट्सअप समुहामध्ये पाठविणे आवश्यक असेल, असे महानगरपालिका आयुक्‍त डॉ. चहल यांनी सर्व यंत्रणांना निर्देश दिले. महानगरपालिका कायद्यानुसार त्‍यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करण्यात येईल. कार्यवाही पूर्ण झाली आहे किंवा कसे, याबाबतचा आढावा घेण्‍यासाठी समितीची सभा पुन्‍हा घेण्‍यात येईल, असेही आयुक्‍त डॉ. चहल यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.