मनी लाँड्रिंगच्या गुन्हयात तुरुंगात असलेले राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या विरुद्ध आलेल्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी ईडीने मंगळवारी कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी येथील काही जेष्ठ नागरिक यांच्याकडे या तक्रारीबाबत चौकशी करीत आहे. ईडीच्या या शोध मोहिमेमुळे नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड येथील जागेचा झालेला व्यवहार गैरमार्गाने करण्यात आला असून या व्यवहारात अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याच्या संशयावरून ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने गेल्या काही महिन्यात राज्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली होती. नवाब मलिक या गुन्ह्यात सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे.
(हेही वाचा – अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम लवकर पूर्ण होणार!)
मलिकांविरुद्ध ईडीकडे तक्रार
या दरम्यान ईडीकडे गोवाला कंपाऊंड येथील काही जेष्ठ नागरिकांनी मलिक यांच्या विरुद्ध ईडीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी ईडीने मंगळवारी सकाळी कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड येथे धडक दिली. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या सुरक्षेत ईडीच्या अधिकऱ्यांनी गोवाला कंपाऊंड येथे शोध मोहीम घेत तक्रारदार असणाऱ्या जेष्ठ नागरिक यांच्या तक्रारीची पडताळणी सुरू केली आहे. या जेष्ठ नागरिकांचे जबाब घेऊन त्याच्याकडे असलेले पुरावे ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. ईडीच्या या शोध मोहिमेमुळे नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community