‘आसनी’ चक्रीवादळ अंदमानमध्ये दाखल! राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा

135

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले आसनी चक्रीवादळ अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाले आहे. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील बारा तासांत वादळ येण्याची शक्तता वर्तवण्यात आली आहे. आसनी हे २०२२ या वर्षातील पहिले चक्रीवादळ आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात सकाळापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या हंगामातील पहिल्या चक्रीवादळाचे नामकरण श्रीलंकेच्या सूचनेनुसार ‘आसनी’ असे करण्यात आले आहे.

( हेही वाचा : फक्त १० मिनिटांत… ‘हा’ निर्णय प्रायोगिक तत्वावर )

हवामान विभागाची माहिती 

आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते त्याचे रुपांतर २१ मार्चला चक्रीवादळात झाले. या वादळामुळे अंदमान निकोबारला जोरदार वारे आणि मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. त्यानंतर २२ मार्चला हे चक्रीवादळ म्यानमार-बांग्लादेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचणार असून २३ मार्चला पहाटे हे वादळ म्यानमारचा किनारा ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

बंगालच्या उपसागरात सोमवारी उद्भवलेल्या चक्रीवादळाचा वेग ताशी 65 ते 75 किमी एवढा असून ते सध्या पोर्टब्लेअरपासून 160 किमी अंतरावर तर मायाबंदरपासून 110 किमी अंतरावर खोल समुद्रात आहे. पुढील बारा तासांत ते अंदमानातून म्यानमारकडे सरकेल आणि मग शांत होईल. या दरम्यान केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईसह कोकणाला पावसाचा इशारा 

या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. २३, २४ आणि २५ मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.