देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळेच नागरिक पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची निवड करत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेच्या ताफ्यात दहा इलेक्ट्रिक कार दाखल झाल्या आहेत. आणखी ३८ वाहनांची महापालिकेला प्रतिक्षा असून येत्या काळात ही वाहने पुणे महापालिकेच्या ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी व्यक्त केली आहे.
( हेही वाचा : पश्चिम घाटाचे सौंदर्य पाहण्यासाठी देशातील पहिली फॉरेस्ट ‘कॅनोपी’ ट्रेन! )
महापालिकेच्या ताफ्यात दहा इलेक्ट्रिक कार
ई-व्हेइकल्सचा पुरवठा करण्यासाठीची निविदा मंजूर झालेल्या सरकारी कंपनीने गेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेला या कारसाठी प्रतिक्षेत ठेवले होते. महापालिकेला भाडेतत्त्वावर कारचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदार कंपनीने या दहा कार उपलब्ध केल्या आहेत. महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, पीएमपीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या उपस्थितीत ही वाहने महापालिकेच्या मोटार वाहन विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
महापालिका परिसरात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा मानस
महापालिकेने अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी २३ कोटी २८ लाख ८८ हजार रुपये खर्चून ३८ टाटा नेक्सॉन या इलेक्ट्रिक कार घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने सात महिन्यांपूर्वी मान्य केला होता. महापालिकेला भाडेतत्त्वावर कारचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदार कंपनीने १० इलेक्ट्रिकल कार उपलब्ध केल्या आहेत. त्यासाठी महापालिका इमारतीच्या आवारात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा मानस महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. क्षेत्रीय कार्यालयांचे प्रमुख, तसेच विभागप्रमुखांसाठी या वाहनांचा वापर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community