महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांच्या कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांनी न्यायालयामध्ये पाठीचा त्रास असल्यामुळे पलंग, गादी व घरून जेवणाचा डबा मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्यांचा अर्ज मान्य झाला असून त्यांना पलंग वापरण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. तोच धागा पकडून अमरावतीमधील भाजप नेते डॉ. अनिल बोंडे व अन्य पदाधिकाऱ्यांनी नवाब मलिकांना पलंग व गादी पाठवून आपण जेलमध्येच आराम करावा व आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे पाठवून द्यावा, असे म्हणत मंगळवारी आंदोलन केले. देशद्रोही असलेल्या दाऊद इब्राहीम सोबत संबंध तसेच मंत्री नवाब मलिक यांचे टेरर फंडिंगमध्ये नाव आल्यामुळे त्यांच्या कोठडीत ४ एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
भाजप नेते अनिल बोंडेंचा आरोप
नवाब मलिक यांच्या अल्पसंख्याक मंत्री पदाची जबाबदारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर कौशल्य विकास मंत्रीपदाचा कारभार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परभणीचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे, तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. शरद पवार यांना माहिती आहे की, जनाब नवाब मलिक यांचा जेलमधील मुकाम प्रदीर्घ आहे म्हणून त्यांच्याकडील सर्व मंत्री पद व राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्षपद सुद्धा काढून घेतले. शरद पवार वापरून घेतात व सोडून देतात, असा आरोप माजी मंत्री व भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
( हेही वाचा : ही तर राक्षसी हुकूमशाहीची सुरुवात! संजय राऊत संतापले )
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, जयंत डेहनकर, गजानन देशमुख, ललित समदुरकर, प्रशांत शेगोकार, राहुल जाधव, दिलीप करुले, विजय चीलातरे, गोवर्धन सगणे, ज्ञानेश्वर तेलखेडे, दीपक अनासाने, नरेंद्र राउत, म्हस्के यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community