मुंबई महानगरात राज्य सरकार आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या उत्तम समन्वयातून झालेल्या कामकाजामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने योग्य प्रतिसाद दिला. त्यातूनच मुंबई महानगर फक्त सावरलेच नाही तर, नवीन जीवनशैली स्वीकारून पुढच्या दिशेने निघाले आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.
कोविडच्या साथीचे अर्थव्यवस्थेत उमटलेले विपरित परिणाम
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या वतीने अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना सेवांतर्गत प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रशिक्षण दिले जाते. मनुष्यबळ आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या विनंतीनुसार मागील ११ वर्षांपासून हा उपक्रम सुरु आहे. यंदादेखील संस्थेच्या वतीने दिनांक २१ ते २५ मार्च २०२२ या कालावधीत सामाजिक धोरणे आणि शासन या विषयावर आणि कोविड – १९ परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी, वन सेवेतील अधिकारी असे मिळून सुमारे ३० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, प्राधिकरणांचे संचालक, सचिव अशा महत्त्वाच्या हुद्यांवर सेवा बजावत असलेल्या या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सामाजिक धोरण व शासन कोविड – १९ ची सद्यस्थिती या विषयावर व्याख्यान दिले. कोविडची साथ, त्याचे समाजव्यवस्थेत आणि अर्थव्यवस्थेत उमटलेले विपरित परिणाम, यातून सावरण्यासाठी शासकीय धोरणांचे व कामकाजाचे महत्त्व यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
( हेही वाचा : महापालिकेच्या ताफ्यात दहा इलेक्ट्रिक कार! )
अखिल भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत असलेले अधिकाऱ्यांच्या समुहाने सेवांतर्गत नियमित प्रशिक्षणाचा भाग म्हणून धारावी परिसरात भेट दिली. धारावीसह संपूर्ण मुंबईत महानगरपालिका प्रशासनाने कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या अथक आणि वैविध्यपूर्ण कामांची माहिती सुरेश काकाणी यांनी या समुहाला दिली. महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाची कामगिरी पाहून प्रशिक्षणासाठी आलेला हा समुहदेखील भारावून गेला. कोविड विषाणू संसर्ग स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या कामकाजाची, मुंबई मॉडेलची सविस्तर माहिती देऊन आता हे मॉडेल मुंबईतील विभाग पातळीवर राबविण्यात येईल आणि त्यातून नागरी सेवा-सुविधांचा दर्जा सर्वोत्कृष्ट करण्यासाठी मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
‘दि धारावी मॉडेल’
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या समुहाने दाट लोकवस्तीच्या धारावी परिसराला भेट दिली. धारावीतील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विभागीय नियंत्रण कक्ष म्हणजेच वॉर्ड वॉर रुमलाही भेट देऊन तेथील कामकाज प्रशिक्षणार्थींनी समजून घेतले. जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर हेही यावेळी उपस्थित होते. धारावीसारख्या अत्यंत दाटीवाटीच्या लोकवस्तीत कोविडची साथ रोखण्यासाठी केलेल्या अभिनव उपाययोजना, संगणकीय तंत्रज्ञान आणि त्याच्या आधारे तयार केलेली माहिती, सांख्यिकी विश्लेषण यातून धोरणे आखण्यासाठी झालेला उपयोग, रुग्णसेवा व आरोग्यसेवा पुरविताना आधुनिक तंत्रज्ञान आणि सामुग्रीची झालेली मदत, मनुष्यबळामध्ये समन्वय राखून अडचणींवर मात करताना आलेले अनुभव या सर्वांचे कथन दिघावकर यांनी केले. धारावीतील कोविड व्यवस्थापन करताना आलेल्या अनुभवांवर आधारित ‘दि धारावी मॉडेल’ या स्वलिखित पुस्तकाच्या प्रतीही त्यांनी अधिकाऱ्यांच्या समुहाला भेट स्वरुपात दिल्या. धारावीतील पहिला रुग्ण आढळल्यानंतर त्याचा शोध घेण्यापासून ते टाळेबंदी दरम्यान गरजू नागरिकांना अन्न वाटप करेपर्यंत, धारावीतील दवाखाने सुरु करण्यापासून केलेल्या प्रयत्नांपासून ते घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करेपर्यंत आलेल्या आव्हानांची माहिती घेतल्यानंतर व प्रत्यक्ष धारावी क्षेत्रीय पाहणी केल्यानंतर अधिकारऱ्यांचा समूह थक्क झाला. कोविड कालावधीत विशेषतः टाळेबंदी दरम्यान धारावीसारख्या ठिकाणी कामकाज करणे महानगरपालिका प्रशासनाला किती आव्हानात्मक ठरले असेल, याचा विचार करुन ते सर्वजण भारावले.
Join Our WhatsApp Community