सुट्ट्यांच्या काळात रेल्वेने बाहेरगावी जाणा-या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी भारतीय रेल्वेकडून कळत आहे. रेल्वेने प्रवास करत बाहेरगावी किंवा कोकणात जाणारे प्रवासी अनेक महिने आधीपासून ऑनलाईन बुकिंग करत असतात. मात्र हे बुकिंग करताना कन्फर्म तिकीट मिळाले नाही, तरी आता चिंता करण्याचे कारण नाही.
कुठल्याही ट्रेनमध्ये जर सीट रिकामी झाली तर त्याची माहिती आता प्रवाशांना त्वरित मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट बूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे सुट्ट्यांचे प्लॅनिंग करणा-या पर्यटकांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरत आहे.
(हेही वाचाः संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालय संतापले!)
आयआरसीटीसीची नवी सुविधा
आयआरसीटीसी कडून पुश नोटिफिकेशनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात आपल्या गावी किंवा इतर ठिकाणी फिरायला जाणारे अनेक प्रवासी हे रेल्वेने जाणं पसंत करतात. आता आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन ऑनलाईन तिकीट बूक करणा-यांना सीटची उपलब्धता तपासता येते. जर कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर वेटिंग तिकीट कन्फर्म होईपर्यंत आपल्याला वाट पहावी लागते. वेटिंग जास्त असेल तर प्रवाशांचा हिरमोड हाऊन ते तिकीट बूक करत नाहीत. पण आता ट्रेनमध्ये सीट रिकामी झाल्यास त्याची माहिती रेल्वेकडून मेसेजद्वारे त्वरित देण्यात येणार आहे. त्यामुळे झटपट तिकीट बूक करणे शक्य होणार आहे.
कशी मिळणार माहिती?
जेव्हा तुम्ही प्रवासासाठी एखाद्या ठराविक तारखेचं बुकिंग करत असाल आणि जेव्हा तुम्हाला सीट उपलब्ध दिसत नाही तेव्हा तुम्ही तिकीट बूक करत नाहीत. पण तुम्ही ज्या ट्रेनमधील तिकीटांची उपलब्धता तपासली असेल, त्या ट्रेनमधील कुठलीही जागा उपलब्ध झाली तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे देण्यात येईल. यामध्ये ट्रेन नंबरची माहिती असेल, त्याद्वारे तुम्हाला बुकिंग करता येणार आहे.
(हेही वाचाः मांसाहारी खवय्यांच्या खिशाला चटका, वाढले चिकनचे भाव!)
काय करावे लागेल?
यासाठी जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाईटला व्हिसिट कराल तेव्हा तुम्हाला पुश नोटिफिकेशनचा पर्याय सुरू करायचा आहे. ही सेवा विनामूल्य असणार आहे. तसेच यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community