गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या S-6 या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणाऱ्या ५९ कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. मात्र आता अशाच प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाट ब्लॉकच्या बागतुई गावात २१ मार्चच्या रात्री तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) उपप्रमुख भादू शेख यांच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला. या घटनेलाच प्रत्युत्तर देत शेख यांच्या समर्थकांनी गावातील किमान १० ते १२ घरांना आग लावल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.
नेमकं काय घडलं?
पोलीस महासंचालक मनोज मालवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाच घरातून सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जाळपोळीच्या घटनेत ११ जणांना अटक करण्यात आली आहे, तर शेख यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोरांचा शोध मोठ्या प्रमाणावर सुरू आल्याचे त्यांनी सांगितले. जाळपोळीच्या घटनेशी राजकीय संबंध असल्याचे नाकारत यामागे वैयक्तिक वैर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. २१ मार्चच्या रात्री तृणमूल काँग्रेसचे नेते भादू शेख यांच्या हत्येच्या एका तासानंतर जवळपासची सात ते आठ घरे जाळण्यात आली, असे त्यांनी सांगितले. घरातून सात मृतदेह सापडले, तर एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून रामपूरहाटचे पोलीस स्टेशन प्रभारी आणि एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे.
(हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याचे ११ फ्लॅट्स ईडीकडून जप्त)
विशेष तपास पथकाची नेमणूक
दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हेगारी अन्वेषण विभाग) ज्ञानवंत सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्री आणि कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांचे तीन सदस्यीय पथक घटनास्थळी पाठवले आहे. हकीम म्हणाले की, तृणमूल नेत्याची हत्या आणि गावातील जाळपोळ यांचा एकमेकांशी संबंध आहे का, हे अद्याप कळू शकलेले नाही.
टीएमसीने दिले स्पष्टीकरण
स्थानिक शत्रुत्वातून ही घटना घडल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला. त्यांनी ट्विट केले की, रामपूरहाट आगीच्या घटनेतील मृत्यू दुर्दैवी आहेत पण त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्हा प्रमुख अनुब्रत मंडल यांनी सांगितले की, शेखचा मृतदेह सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी करत आहेत. जाळपोळीच्या घटनेबाबत दावा करत त्यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले आहे.
ममता बॅनर्जींकडे मागितला राजीनामा
या घटनेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी जाळपोळीची घटना म्हणजे नरसंहार असल्याचे म्हटले आहे. सलीम यांचा आरोप आहे की, या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना तपास आणि सत्य दडपण्यासाठी करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community