केंद्रीय यंत्रणांच्या नावाने ‘वसुली’चे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात नाही ना?, अशी शंका निलंबित पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित होत आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते आमदार तथा अधिवक्ता आशिष शेलार यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत केली. त्या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आशिष शेलार यांनी दिलेल्या माहिती नोंद घेतो, तसेच ही माहिती सत्य असेल, तर दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र आणि देश यांची बदनामी होण्याची शक्यता
राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आय.पी.एस्. अधिकारी अंगडीया या व्यापार्याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसुली करत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना निलंबित केले. या कारवाईचे स्वागत करतांना आमदार आशिष शेलार म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांची अपर्कीती करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसुली करत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे?, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. असे असेल, तर महाराष्ट्र आणि देश यांची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर गोष्ट असून याप्रकरणी तातडीने सरकारने नोंद घेऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी केली.
Join Our WhatsApp Community