पुण्यात महापारेषण कंपनीच्या भोसरी येथील अति उच्चदाब 220 केव्ही उपकेंद्रातील 100 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या बटणावर एका मांजरीने उडी मारली. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर बंद पडला. परिणामी पुण्यात विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळाला. यामुळे महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे भोसरी, आकुर्डीमधील 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला.
महापारेषणकडून या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील बिघाड शोधण्याचे काम जलदगतीने सुरु असले तरी अद्यापही बिघाड दुरुस्त झालेला नाही. दरम्यान, सध्या पर्यायी किंवा इतर तांत्रिक उपाययोजनेतून वीजपुरवठा कमीत कमी कालावधीसाठी बंद राहील यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
(हेही वाचा चौकशी होणारच! दिलीप वळसे-पाटील)
या भागातील वीज गायब
पिंपरीतील प्रामुख्याने भोसरी एमआयडीसी एस ब्लॉक, टी ब्लॉक, भोसरी एमआयडीसी परिसर तसेच नेहरूनगर, यशवंतनगर, शांतीनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, भोसरी परिसर व आकुर्डी परिसर आदी भागातील 4500 औद्योगिक ग्राहकांसह सुमारे 60 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. हा ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या 220 केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव 75 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील 16 वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या 10 वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे.
Join Our WhatsApp Community