मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करामध्ये येत्या एप्रिलपासून वाढ केली जाणार असून ही वाढ विद्यमान कराच्या १५ टक्के एवढी असेल. मागील दोन वर्षे करवाढीला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून मुंबईकरांवर मालमत्ता करातील वाढ टळली होती, परंतु आता ही वाढ अटळ असून मुंबईकरांना या करवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
( हेही वाचा : मुंबईतील पदपथांची पाण्याने सफाई )
महापालिका आयुक्तांचे संकेत
मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराच्या वसूली करण्यासाठी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले जात असून ११ मार्चपर्यंत ४५७१ कोटी रुपयांची वसूली करता आली होती. येत्या ३१ मार्च पर्यंत महापालिकेला मालमत्ता करातून ५४०० कोटींची वसुली अपेक्षित आहे. मात्र, पुढील आर्थिक वर्षात मालमत्ता करात १५ टक्के वाढ प्रस्तावित असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी संकेत दिले होते.
मालमत्ता करात वाढ
मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करामध्ये दर पाच वर्षांनी भांडवल्यमूल्य आधारीत करप्रणालीमध्ये वाढ केली जाते. एप्रिल २०१०मध्ये प्रथम भांडवली मुल्य कर प्रणालीचा अवलंब करण्यात आल्यानंतर पुढील दर पाच वर्षांनी ही वाढ प्रस्तावित केलेली आहे. त्यानुसार एप्रिल २०१५ ते मार्च २०२० या कालावधीसाठी ही वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एप्रिल २०२० ते मार्च २०२५ या कालावधीसाठी मालमत्ता करामध्ये वाढ होणे अपेक्षित होते. परंतु कोविडमुळे बंद असलेले उद्योगधंदे आणि लोकांच्या नोकरी व रोजगारावर झालेल्या परिणामामुळे पहिल्या वर्षी ही सवलत देण्यात आली. परंतु त्यानंतर कोविडचा परिणाम असल्याने चालू वर्षातही कोणत्याही प्रकारची वाढ न करता जुन्याच पध्दतीनुसार कराची आकारणी केली जात आहे.
परंतु आता नवीन आर्थिक वर्षांपासून मालमत्ता करात वाढ केली जाणार असून त्यानुसार आता वाढीव दरानुसार मुंबईकरांना मालमत्ता कराची देयके जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत् आहे. करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी याबाबत बोलतांना ही वाढ क्रमप्राप्त असल्याचे सांगितले. दर पाच वर्षांनी ही वाढ केली जाते. परंतु मागील दोन वर्षे ही करवाढ कोविडमुळे केली नव्हती. परंतु येत्या एप्रिलपासून ही वाढ केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community