राष्ट्रीय महामार्ग निर्मिती कामावर देखरेख आणि लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, मंत्रालय आणि भारतीय रस्ते संघटना (आयआरसी) ने निश्चित केलेल्या गुणवत्तेच्या प्रमाणित निकषांनुसार बांधले जात आहेत. रस्ते बांधकामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, सल्लागारांची, प्राधिकरण अभियंते/ स्वायत्त अभियंते म्हणून नेमणूक करण्यात येते. असे असले तरी निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधले जाताना दिसत होते, मात्र आता निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधणाऱ्यांची आता खैर नसणार आहे. कारण रस्ते बांधणीवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा असणार आहे.
त्या तक्रारींची दखल घेत योग्य तो बदल होणार
रस्ते बांधकामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठीचे हे सल्लागार रस्ते बांधणीच्या कामांचे दैनंदिन निरीक्षण करुन करारानुसार गुणवत्तेचा दर्जा राखला जात आहे, यावर लक्ष देत असतात. जर निकृष्ट गुणवत्तेचे काम आढळले, तर त्यात सुधारणा केली जाते आणि निकषांनुसार पुन्हा रस्ते बांधणीचे काम केले जाते. राष्ट्रीय महामार्गावरील बांधकामाच्या गुणवत्तेविषयी काही तक्रारी असल्यास त्या तक्रारींची दखल घेत त्यानुसार योग्य तो बदल करण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात असून, ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
(हेही वाचा – कोळी बांधवांच्या विरोधामुळे धारावीतील पंपिंग स्टेशनची जागा बदलली)
निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास…
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत विकास महामंडळ, सीमा रस्ते संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते बांधणी विभाग, राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांची महामंडळे, या कामांचे वेळोवेळी परीक्षण करत असतात. निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास ते सुधारण्यासाठी ताबडतोब आवश्यक ती पावले उचलली जातात. जर काही त्रुटी आढळल्या तर संबंधित यंत्रणांवर कारारातील तरतुदींनुसार करवाई केली जाते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
Join Our WhatsApp Community